मेक इन इंडियाचा नारा देणा-या मोदींचा सूट मात्र विदेशी - राहुल गांधी
By Admin | Updated: February 4, 2015 14:29 IST2015-02-04T14:28:14+5:302015-02-04T14:29:17+5:30
मेक इन इंडियाचा नारा देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १० लाख रुपयांचा सूट मात्र मेड इन युरोप असल्याचा टोला लगावत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मेक इन इंडियाचा नारा देणा-या मोदींचा सूट मात्र विदेशी - राहुल गांधी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - मेक इन इंडियाचा नारा देणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १० लाख रुपयांचा सूट मात्र मेड इन युरोप असल्याचा टोला लगावत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींमुळे देशातील नागरिकांना नव्हे तर दोन - तीन उद्योजकांचाच फायदा झाला आहे असे त्यांनी सांगितले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी प्रचारसभा घेतली. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिल्लीकरांना काही मिळणार नाही, काँग्रेस सत्तेवर आल्यास दोन वर्षात दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या काळात अनेक आश्वासन दिली, पण त्यांनी किती आश्वासनं पूर्ण केलीत. निवडणुकीत भ्रष्टाचारावर बोलणारे मोदी आता त्यावर काहीच बोलत नाही असा आरोपही त्यांनी केला. कच्च्या तेलाची किंमती कमी होऊनही त्यातुलनेत भारतात पेट्रोल व डिझेलच्या दरात फारशी कपात झाली नाही, भाजीपाल्याचे दरही वाढतच आहेत असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
जयंती नटराजन यांचा चोख प्रत्युत्तर
या सभेत राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे जयंती नटराजन यांच्या आरोपावर उत्तर दिले आहे. जयंती नटराजन यांना पर्यावरण आणि आदिवासींच्या रक्षणासाठी आदेश दिले होते, मी दुर्लक्षित घटकांसाठी काम केले असून भविष्यातही माझे काम सुरुच ठेवणार असे त्यांनी सांगितले.