‘प्रेमाचे प्रतीक’ अवतरले ट्विटरवर!
By Admin | Updated: August 16, 2015 02:36 IST2015-08-16T02:36:50+5:302015-08-16T02:36:50+5:30
शाश्वत आणि सच्च्या प्रेमाचे प्रतीक आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल आता ट्विटरवर आला आहे. एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे ट्विटरवर

‘प्रेमाचे प्रतीक’ अवतरले ट्विटरवर!
नवी दिल्ली : शाश्वत आणि सच्च्या प्रेमाचे प्रतीक आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल आता ट्विटरवर आला आहे. एखाद्या ऐतिहासिक स्थळाचे ट्विटरवर अकाउंट सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे हे अकाउंट सुरू होताच हजारो फॉलोअर्सनी ताजला फॉलो करण्यास सुरुवात केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी स्वातंत्र्यदिनी या अकाउंटची सुरुवात केली. यावेळेस उत्तर प्रदेशचे पर्यटन सचिव अमृत अभिजात यांनी ट्विटरवर ताजसारखे ऐतिहासिक स्थळ पहिल्यांदाच येत आहे, असे सांगत आनंद व्यक्त केला. टिष्ट्वटरवर अकाउंट सुरू केल्यानंतर ‘ताजमहाल, जगातील एक आश्चर्य, सर्वात जास्त प्रेम मिळालेले आग्रा येथील स्मारक’, अशा शब्दांमध्ये त्याचे वर्णन करण्यात आले आहे.
यावर ‘माझ्या ताजच्या आठवणी’ अशा हॅशटॅगवर लोकांना फोटो टाकता येणार आहे. अकाउंट सुरू झाल्यावर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पत्नी डिंपल यांच्यासह ताजच्या पार्श्वभूमीवर काढलेला फोटो शेअर केला. त्यानंतर तासाभरातच २००० फॉलोअर्सचा टप्पा ताजने पार केला. त्यानंतर सायंकाळपर्यंत ताजमहालला फॉलो करणाऱ्यांची संख्या ५ हजारांपेक्षाही पुढे गेली होती. आज खऱ्या अर्थाने शहाजहानला अभिमान वाटला असेल, असे ट्विट एका फॉलोअरने केले आहे.
पहिलेच ट्विट..
ताजमहालने अकाउंट सुरू केल्यानंतर पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की या जगात केवळ दोनच प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांनी मला भेट दिली आहे आणि जे मला येथे फॉलो करतात आणि दुसरे लोक ज्यांनी मला भेट दिलेली नाही आणि येथे फॉलो करीत नाहीत.
फॉलोअर्सच्या उड्या
जगातील सर्वात सुंदर संगमरवरी दगडाने बनविलेल्या ताजच्या टिष्ट्वटर अकाउंटवर फॉलोअर्सच्या उड्या पडल्या आहेत. संध्याकाळपर्यंत ४,८४६ लोकांनी त्यास फॉलो करण्यास सुरुवात केली होती.