प्रेम ही नवनिर्मितीची गुरुकिल्ली

By Admin | Updated: January 6, 2015 00:09 IST2015-01-05T22:04:20+5:302015-01-06T00:09:32+5:30

रावसाहेब कसबे : सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे उत्साहात वितरण

Love is the key to the new creation | प्रेम ही नवनिर्मितीची गुरुकिल्ली

प्रेम ही नवनिर्मितीची गुरुकिल्ली

रावसाहेब कसबे : सावित्रीबाई फुले पुरस्कारांचे उत्साहात वितरण

नाशिक : आयुष्यात ज्यांना प्रेम लाभते, तीच माणसे समाजाला दिशा देतात. प्रेम न लाभलेल्या माणसांचे आयुष्य रिते असते. प्रेमामध्ये जग बदलण्याची ताकद असते. ती नवनिर्मितीची गुरुकिल्ली असते; मात्र हे प्रेम वरवरचे नव्हे, तर अंत:करणातून असावे लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते. नांदेड येथील प्राध्यापिका व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. तसनीम पटेल, शिरूर तालुक्यातील बाभूळसर येथील प्रयोगशील शिक्षक दत्तात्रय सकट व बेबीनंदा सकट यांना यावेळी सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. पटेल यांनी पुरस्काराची रक्कम पुन्हा वाचनालयाला सुपूर्द केली, तर सकट यांनी व्याख्यानातून मिळणारा निधी वाचनालयाला देण्याची घोषणा केली.
डॉ. कसबे म्हणाले की, समाजात सध्या कोणीच कोणाला चांगले काम करू देत नाही. राजकीय नेत्यांकडून त्यांना अटकाव केला जातो. बर्‍याचदा घरातूनही विरोध होतो; मात्र जोडीदाराकडून प्रेम मिळत असलेली माणसे संघर्षात यशस्वी होतात. आशेची ही बेटे समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखवतात. उत्तम कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सुर्वे वाचनालयाचे सचिव राजू नाईक यांनी प्रास्ताविक केले. संगीता उदमले, विमल पोरजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. डॉ. विवेक खरे यांनी सूत्रसंचालन केले. करुणा कांबळे यांनी आभार मानले.
उकीडवे बसून अभ्यास
लहानपणी एका खोलीत सहा माणसे राहत असल्याने तासन्तास उकीडवे बसून अभ्यास केला. फुले, डॉ. आंबेडकरांच्या विचारांमुळे पुढे जाऊ शकले. चळवळीत पती मेहताब पठाण हे जोतिरावांसारखे पाठीशी उभे राहिले. स्त्रीमुक्तीचा वैचारिक वसा घेऊन वाटचाल करा, मुलींना दुय्यम लेखू नका.
- प्रा. डॉ. तसनीम पटेल, पुरस्कारार्थी
 

Web Title: Love is the key to the new creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.