नवी दिल्ली : एप्रिल ते जुलै दरम्यान राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या ५९ खासदारांना बुधवारी खेळीमेळीच्या वातावरणात निरोप देण्यात आला. ‘मोहब्बत हमारे साथ और शादी मोदी साहब के साथ,’ असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.
काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी देवेगौडा यांच्यासमवेत असलेल्या प्रदीर्घ मैत्रीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, मी देवेगौडा यांना ५४ वर्षांहून अधिक काळापासून ओळखतो. त्यांच्यासमवेत कामही केलेले आहे. नंतर काय झाले कळाले नाही. त्यांनी मोहब्बत आमच्यासोबत केली व शादी मोदी साहब यांच्यासमवेत केली.
खरगे यांनी मोदींच्या उपस्थितीत ही बाब बोलून दाखविल्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. खरगे यांनी यावेळी सभागृहाच्या नियमांचा वेळोवेळी आढावा घेण्याची मागणी केली. सार्वजनिकरीत्या महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर अधिक चर्चा व्हावी, यासाठी अधिक कामकाज झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. खरगे निवृत्त होत असले, तरी त्यांना पुढचा कार्यकाळ मिळालेला आहे.
‘संसद हे तर मुक्त विद्यापीठ; राजकारणात ‘पूर्णविराम’ नसतो’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेला ‘मुक्त विद्यापीठ’ म्हटले. राजकारणात ‘पूर्णविराम’ नसतो. अशा क्षणी पक्षांमधील मतभेद नाहीसे होतात. काही सदस्य सभागृहात परत येतील, काही येणार नाहीत. राजकारणात ‘पूर्णविराम’ अशी कोणतीही गोष्ट नसते.
पंतप्रधानांनी द्विसदनीय संसदीय रचनेतील विधेयके मंजूर करण्याच्या प्रक्रियेची तुलना ‘सेकंड ओपिनियन’शी केली. यामुळे लोकशाही निर्णयप्रक्रिया अधिक मजबूत होते, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी, सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात करताना सांगितले की, दर दोन वर्षांनी एक-तृतीयांश सदस्यांची सेवानिवृत्ती राज्यसभेच्या कामकाजात सातत्य सुनिश्चित करते. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांनी प्रियंका चतुर्वेदी, साकेत गोखले, ऋतब्रता बॅनर्जी या तरुण खासदारांच्या योगदानाचा उल्लेख केला. तिरुची शिवा यांनी दिग्विजय सिंह, रजनी पाटील, भुवनेश्वर कलिता व के.टी.एस. तुळसी यांच्या योगदानाची प्रशंसा केली. एन.आर. एलंगो व कनिमोझी एन.व्ही.एन. सोमू यांच्या योगदानाचीही प्रशंसा केली.
देवेगौडा, खरगे, पवार यांची प्रशंसापंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेषतः तीन ज्येष्ठ नेत्यांची प्रशंसा केली.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक काळ संसदीय कामकाजात घालवला आहे, असे स्तंभ आहेत.ज्या प्रकारे ते नियमितपणे सभागृहात उपस्थित राहतात व इतक्या निष्ठेने कामकाजात सहभागी होतात, ते खरोखरीच अनुकरणीय आहे.
सर्व नवीन खासदारांनी शिकले पाहिजे अशी ही वृत्ती आहे, असेही मोदी म्हणाले.
आमचे रामदास आठवले खरोखरच सदाबहार आहेत. ते निवृत्त होत आहेत, तरीही मला खात्री आहे की ते पुढेही सेवा करीत राहतील, असेही मोदी यांनी म्हटले.