अर्थव्यवस्थेला पावणार प्रभू श्रीराम; ५० हजार कोटींची होणार उलाढाल, देशभरात व्यवसाय वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 06:09 AM2023-12-29T06:09:15+5:302023-12-29T06:09:26+5:30

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात ५० हजार कोटींचा अतिरिक्त व्यवसाय होण्याची शक्यता आहे. 

lord ram bless will boost the economy there will be a turnover of 50 thousand crore | अर्थव्यवस्थेला पावणार प्रभू श्रीराम; ५० हजार कोटींची होणार उलाढाल, देशभरात व्यवसाय वाढणार

अर्थव्यवस्थेला पावणार प्रभू श्रीराम; ५० हजार कोटींची होणार उलाढाल, देशभरात व्यवसाय वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. हा क्षण संस्मरणीय बनविण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून तब्बल ५० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

व्यापारी संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (काईट) सांगितले की, अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात ५० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त व्यवसाय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी व्यावसायिकांनी आतापासूनच कंबर कसली आहे. यासंदर्भात ‘काईट’चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने १ जानेवारीपासूनच देशभर अभियान चालविण्याची घोषणा विश्व हिंदू परिषदेने केली. त्यातून नव्या व्यवसाय संधी निर्माण होतील. प्रभू रामांशी संबंधित वस्तूंची मागणी वाढली आहे.

या वस्तूंची होणार विक्री

खंडेलवाल यांनी सांगितले की, उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने प्रभू रामांशी संबंधित पुढील वस्तूंची मागणी वाढेल. रामध्वज, राम अंगवस्त्र, रामाची चित्रे असलेल्या माळा, लॉकेट इ. राम दरबाराची चित्रे, राम मंदिराच्या मॉडेलची चित्रे, सजावटीचे साहित्य, रामनामाचे कडे.

रोजगारही वाढणार

२२ जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे पणत्या, रांगोळी, फुले आणि रोषणाईचे साहित्य यांची चांगली विक्री होईल. यामुळे व्यापारात तेजी येईल. साेबतच माेठ्या संख्येने हाेर्डिंग, पाेस्टर, बॅनर, पत्रके, स्टीकर्स इत्यादी तयार केले जात आहेत. यातून लाेकांना राेजगारही मिळत आहे.

खादीही तेजीत

राम मंदिराच्या मॉडेलचे चित्र छापलेले कुर्ते, टी-शर्ट व अन्य कपडे बाजारात आले आहेत. कशिदा कामाद्वारे मंदिराचे चित्र असलेले कपडेही येत आहेत. कुर्ते बनविण्यासाठी प्रामुख्याने खादी वापरली जात आहे. त्यामुळे खादी उद्योगासही लाभ होत आहे.

मंदिर प्रतिकृतीला मागणी

राम मंदिराच्या मॉडेलला मोठी मागणी आली आहे. ही मॉडेल्स हार्डबोर्ड, पाइनचे लाकूड तथा अन्य लाकूड यांपासून वेगवेगळ्या आकारात बनविली जात आहेत. यातून स्थानिक कारागिरांना रोजगार मिळत आहे.

 

Web Title: lord ram bless will boost the economy there will be a turnover of 50 thousand crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.