Rahul Gandhi on CEC Appointment: आयएएस अधिकारी आणि विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आज निवृत्त होणार असून ज्ञानेश कुमार हे पदभार स्विकारणार आहेत. ज्ञानेश कुमार हे नव्या कायद्यानुसार नियुक्त झालेले ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. या समितीच्या शिफारशीनुसार नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. मात्र राहुल गांधी यावर आक्षेप घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सोमवारी ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर कायदा मंत्रालयाने त्यांच्या नावाची घोषणा केली. मात्र काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांची पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांसाठी पाच नावे देण्यात आली होती. मात्र राहुल गांधी यांनी पाचही नावांचा या पदासाठी विचार करण्यास नकार दिला. या नियुक्तीनंतर राहुल गांधी यांनी असहमती दर्शवत एक पत्र जारी केलं आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे ही बैठक व्हायला नको होती, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
"हस्तक्षेपापासून मुक्त असलेल्या स्वतंत्र निवडणूक आयोगाचा सर्वात मूलभूत पैलू म्हणजे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रिया. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि भारताच्या सरन्यायाधीशांना समितीमधून काढून टाकून मोदी सरकारने निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेबद्दल लाखो मतदारांच्या मनात शंका निर्माण केली आहे. विरोधी पक्षनेता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान दिलेल्या नेत्यांचा आदर राखणे आणि सरकारला जाब विचारणे हे माझे कर्तव्य आहे. या समितीच्या निवडीवर आणि या प्रक्रियेलाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना आणि ४८ तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्री नवीन मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याचा निर्णय घेणे हे संतापजनक आहे," असं राहुल गांधी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट १९ फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. या प्रकरणाची सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोतीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर मांडले. प्रशांत भूषण यांनी सरकार नवीन आयुक्तांची नियुक्ती करू शकते, त्यामुळे न्यायालयाने त्यावर लवकर सुनावणी करावी, असं म्हटलं होतं. त्यावर न्यायालयाने १९ फेब्रुवारीची तारीख देत यादरम्यान काही घडले तर ते न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असेल, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे सांगितले होते.