नवी दिल्ली : देशातील युवकांना जेव्हा विरोधाचा आवाज बुलंद करताना बघतो तेव्हा आपल्याला ‘सुरक्षित’ झाल्यासारखे वाटते, असे सांगून प्रख्यात गीतकार आणि लेखक गुलजार यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दिला आहे.जेएनयूमध्ये सुरू असलेल्या वादाबाबत बोलताना ८१ वर्षीय गुलजार म्हणाले, ‘आजचा युवक हा देशाची आशा आहे. आम्ही आमच्या सेंट स्टीफन्स कॉलेजच्या काळात रशियन क्रांतीवरील पुस्तके वाचत असू. आज क्रांती आणि असहमतीचा आवाज जर कुणी बुलंद केला असेल तर तो या युवकांनीच केला आहे. जेएनयूमधून हा आवाज उठला आहे. या युवकांना बघितल्यावर निश्चिंत झाल्यासारखे वाटते. मी आणि माझा देश आता सुरक्षित आहे, असे मला वाटते.’‘स्प्रिंग फीव्हर-२०१६’ या कार्यक्रमात ‘किताबे’ या विषयावरील चर्चेत गुलजार बोलत होते. २००५ मधील ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील गाजलेले ‘कजरारे...’ आयटम साँग लिहिण्याची प्रेरणा ट्रक शायरीमधून मिळाल्याचे रहस्योद्घाटन गुलजार यांनी या वेळी केले. या गाण्यामधील काही शब्द तुम्ही ट्रकच्या मागे लिहिलेले पाहिलेच असेल, असे ते म्हणाले. ‘कजरारे...’ हे गुलजार यांचे पहिलेच आयटम साँग नाही. याआधीही त्यांनी ‘दिल से’ चित्रपटासाठी ‘चल छैया छैया...’ हे गीत लिहिले होते. आपल्याला बुलेल शाह यांच्या काव्यामधून हे गीत लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
युवकांची ‘क्रांती’ बघून ‘सुरक्षित’ वाटते
By admin | Updated: March 22, 2016 03:19 IST