नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात कोणतीही तुलना होऊ शकत नाही. जोपर्यंत समोर राहुल गांधी आहेत, तोपर्यंत नरेंद्र मोदींचा विजय हा निश्चित आहे, असे मत रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 2019 च्या निवडणुकीत भाजपाच्या काही जागा कमी होतील. परंतु, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) निश्चितपणे सरकार स्थापन करेल, असा विश्वासही यावेळी आठवलेंनी व्यक्त केला. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात नुकत्याच दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत त्यांनी भाष्य केले. आमचा पक्ष या निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करेल, असे आठवलेंनी सांगितले. आम्ही या निर्णयावर समाधानी नाही. काहीवेळा या कायद्याचा गैरवापर झाला असेल, परंतु त्यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना संरक्षण मिळत असल्याचे आठवले यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा (अॅट्रॉसिटीज अॅक्ट) या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे मान्य करीत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. ए. के. गोयल आणि न्या. उदय उमेश लळीत यांच्या खंडपीठाने मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली होती. कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यास सरसकट अटक करता कामा नये, असेही स्पष्ट केले होते. त्यानुसार, प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळल्यानंतरच अटकेचा पर्याय खुला राहील. म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर आपोआप होणारी अटक टाळली जाणार आहे. आरोपी सरकारी नोकर असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि आरोपी सामान्य नागरिक असेल तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या परवानगीनंतरच त्याला अटक करता येईल. सध्या कायद्यातील कलम १८ अन्वये, गुन्हा दाखल झाल्यास लगेचच अटक होते. आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारला जातो.
जोवर समोर राहुल गांधी आहेत तोवर मोदीच जिंकणार- रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 15:49 IST