Lokmat Parliamentary Awards 2025: भारताचे सरन्यायाधीश पद भूषवलेले न्या. भूषण गवई येथे उपस्थित आहेत. भूषण गवई चीफ जस्टिस होते, पण मी माझ्या पक्षाचा चीफ आहे. जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी पर्मनंट आहे. मला बायपास करायचा प्रयत्न कुणीही करू शकत नाही आणि जर कोणी तसा प्रयत्न केला, तर मी त्यांना बायपास करेन, अशी टोलेबाजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
लोकमत समूहाच्या वतीने दिल्लीत आयोजित लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड २०२५ च्या सोहळ्यात रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत दिलखुलासपणे उपस्थितांना संबोधित केले. लोकमत मिडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांची खासियत आहे की, ते सगळ्या पक्षातील लोकांना एकत्रित आणतात. सर्वपक्षीय नेते एकत्र येत नाहीत. लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य जे समाज कल्याणाचा विचार करतात, देशाच्या विकासाचा विचार करतात, अशा सदस्यांची निवड करून इथे आमंत्रित केले आहे. त्यांना पुरस्कार देण्यासाठी मोठा सोहळा आयोजित केला आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
भूषण गवई सरन्यायाधीश होणे आमच्यासाठी अभिमानास्पद
गवई यांचे वडील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात होते. त्यांच्याविषयी कायम आदराची भावना होती. ते राज्यपालही होते. विरोधी पक्षनेतेही होते. ते एक चांगले नेते होते. भूषण गवई आता सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले. परंतु, आता ते कोणत्या पक्षात जाणार, हे मला माहिती नाही. मात्र, तुमची कारकीर्द खूप चांगली राहिली. आमच्या समाजाचा एक व्यक्ती भारताच्या सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचला, ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तुमच्या हस्ते या सोहळ्या पुरस्कार दिले जाणार आहेत, असे रामदास आठवले म्हणाले.
मी ज्यांच्या सोबत असतो, त्यांना सत्ता मिळते
लोकसभा, राज्यसभेतील सदस्यांना मिळतोय लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड, पण माझे लक्ष आहे की, माझ्या पक्षाला किती मिळतायत वॉर्ड, अशी कविता करत महापालिका निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाबाबत रामदास आठवले यांनी सूचक विधान केले. राजकारणात सगळ्या पक्षांना सत्तेत येण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पक्ष अनेकदा सत्तेत आला. मीही त्यांच्यासोबत होतो. आता भारतीय जनता पक्ष एनडीए सत्तेत आहे. यावेळेसही मी एनडीएसोबत आहे. मी ज्यांच्या सोबत असतो, त्यांना सत्ता मिळते. मी ज्यांच्या सोबत असतो, त्यांना सत्ता मिळते, म्हणून माझे सगळीकडे चालते, अशी चारोळीही रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान, संसदेतील सदस्य अभ्यास करून येतात. जनतेचा आवाज बनतात. स्वतःचे म्हणणे, पक्षाची भूमिका, समाज आणि देशाच्या विकासाबाबत विचार करतात. आपल्या सगळ्याचे पक्ष वेगळे असले तरी आपण एका देशाचे नागरिक आहोत. आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे काम करायचे आहे. सत्तेत कायमस्वरुपी कोणी नसते. आधी वेगळे लोक सत्तेत होते, आता आम्ही सत्तेत आहोत. जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत कुणाला संधी मिळणार नाही. लोकमत पार्लमेंटरी पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन. चांगले कार्य करत राहा. माझा पाठिंबा आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
Web Summary : Ramdas Athawale affirmed his permanent leadership within his party at Lokmat Parliamentary Awards 2025. He highlighted his enduring influence and support for those in power, emphasizing unity for national progress.
Web Summary : रामदास अठावले ने लोकमत संसदीय पुरस्कार 2025 में अपनी पार्टी के भीतर अपने स्थायी नेतृत्व की पुष्टि की। उन्होंने सत्ता में रहने वालों के लिए अपने स्थायी प्रभाव और समर्थन पर प्रकाश डाला, और राष्ट्रीय प्रगति के लिए एकता पर जोर दिया।