लोकसभा निवडणुकीच्या वारेमाप खर्चावर बडगा
By Admin | Updated: February 12, 2015 23:06 IST2015-02-12T23:06:38+5:302015-02-12T23:06:38+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील राजकीय देणग्यांचा मुद्दा गाजत असतानाच लोकसभा निवडणुकीतील वारेमाप खर्चाच्या तपशिलाकडे निवडणूक आयोगाने वक्रदृष्टी वळवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वारेमाप खर्चावर बडगा
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील राजकीय देणग्यांचा मुद्दा गाजत असतानाच लोकसभा निवडणुकीतील वारेमाप खर्चाच्या तपशिलाकडे निवडणूक आयोगाने वक्रदृष्टी वळवली आहे. आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या निधीसंबंधी तपशील केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपने २०१३-१४ या वर्षात ३१ मार्चपर्यंत ३६३ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याचा दावा केला असून, या पक्षाने लोकसभा निवडणुकीवर जवळजवळ दुप्पट ७१४ कोटी रुपये खर्च केले आहेत.
बनावट कंपन्यांच्या नावाने धनादेश देण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर आयकर विभागाने विविध कंपन्यांसह दोन राजकीय पक्षांना अलीकडेच नोटीस बजावल्या असताना लोकसभा निवडणुकीत प्रचंड खर्च करणाऱ्या पक्षांना देणग्या देणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत का? याची शहानिशा आयकर विभागाने चालविली आहे. मार्च ते मे या काळात काही पक्षांनी केलेला खर्च उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असल्याचे आढळून आले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात द्रमुक वगळता कोणत्याही पक्षाने मिळालेल्या निधीची माहिती दिलेली नाही. या पक्षाला २०१३-१४ या वर्षात ८० कोटी मिळाले असून वैयक्तिक देणगी ७७ लाख रुपये मिळाली. वैयक्तिक देणगी २० हजारांवर असल्यास माहिती देणे बंधनकारक आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीवर ५१६ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला आहे. प्रत्यक्षात या पक्षाने मिळालेला निधी फक्त ५९ कोटी रुपये दाखविला आहे. उर्वरित देणगीदारांची नावे या पक्षाने दिलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला १५ कोटी रुपये मिळाले असताना लोकसभा निवडणुकीवर ५१ कोटी रुपये खर्च केले. बसपाला २० हजार रुपयांपेक्षा जास्त वैयक्तिक देणगी मिळालेली नाही. मात्र, या पक्षाने लोकसभा निवडणुकीवर ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकही जागा न मिळालेल्या आम आदमी पार्टीने खर्चाचा तपशील दिलेला नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ( लोकमत न्यूज नेटवर्क)