नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रारंभीपासूनच बिहारमधील मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणावरून सुरू झालेला पेच शुक्रवारीही कायम राहिला. लोकसभेत विरोधक आक्रमक राहिल्याने गदारोळ झाला. त्यामुळे सकाळपासून दोनदा कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी ३च्या सुमारास दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिलेक्ट कमिटीच्या अहवालानुसार आयकर विधेयक-२०२५ मागे घेण्याची परवानगी मागितली. यावर सहमती होऊन हे विधेयक मागे घेण्यात आले.
खासगी विधेयकांचा दिवसशुक्रवार हा संसदेच्या अधिवेशनात खासगी विधेयके मांडण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी बहुतांश अशाच विधेयकांवर चर्चा होते. साधारणपणे दुपारी तीननंतर हे कामकाज होते. विरोधी पक्षाचे सदस्य सातत्याने सरकारी कामकाजात बाधा आणत आहेत. आता या बिगर सरकारी कामकाजातही हे लोक आडकाठी निर्माण करीत असल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली.
मलिक यांना श्रद्धांजलीकामकाज सुरू झाल्यानंतर सकाळी सभापती ओम बिरला यांनी माजी केंद्रीय मंत्री सत्यपाल मलिक यांच्या निधनाची माहिती सभागृहाला दिली. दोन मिनिटे मौन पाळून सदस्यांनी मलिक यांना श्रद्धांजली अर्पण केली.
प्रश्नोत्तरे सुरू झाली पण...यानंतर सभापती बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. परंतु, विरोधी सदस्यांनी बिहारमधील मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणाचा मुद्दा उपस्थित करत चर्चेची मागणी सुरू केली. या गदारोळातच आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
९ ऑगस्टची आठवणभारत छोडो आंदोलनाचा ९ ऑगस्ट हा स्मृतिदिन. यंदा या ८३व्या स्मृतिदिनी महात्मा गांधी यांच्यासह अन्य स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाबद्दल हे सभागृह श्रद्धांजली अर्पण करते, असे सभापती बिरला यांनी नमूद केले.
सभापतींच्या आसनासमोर विरोधकांची घाेषणाबाजी प्रश्नोत्तरे सुरू झाल्यावर विरोधी पक्षांनी बिहार मुद्द्यावर आक्रमक होत चर्चेची मागणी लावून धरल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली. सभापतींच्या आसनासमोर येत विरोधी सदस्यांनी मागणी लावून धरली. पीठासीन अधिकारी कृष्णाप्रसाद तेन्नेटी यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज दुपारी ३ पर्यंत तहकूब करण्यात आले. नंतरही कामकाज होऊ शकले नाही आणि सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.