काळा पैसाप्रकरणी आपने जाहीर केली १५ जणांची यादी
By Admin | Updated: October 27, 2014 17:43 IST2014-10-27T17:41:50+5:302014-10-27T17:43:20+5:30
काळा पैसा दडवणा-यांमध्ये अंबानी बंधू, नरेश गोयल, यशवर्धन बिर्ला यांचासह आणखी १५ मोठ्या उद्योजकांचा समावेश असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

काळा पैसाप्रकरणी आपने जाहीर केली १५ जणांची यादी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - काळा पैसा प्रकरणी कारवाई करण्यात केंद्र सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप करतानाच काळा पैसा दडवणा-यांमध्ये अंबानी बंधू, नरेश गोयल, यशवर्धन बिर्ला यांचासह आणखी १५ मोठ्या उद्योजकांचा समावेश असल्याचा दावा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
केंद्र सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टासमोर काळा पैशाप्रकरणी तिघा खातेधारकांची नावे सादर केली. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काळा पैसा प्रकरणातील १५ खातेधारकांची यादी जहीर केली. केजरीवाल म्हणाले, आम्ही यापूर्वीच काळा पैसा प्रकरणातील खातेधारकांची यादी जाहीर केली होती. त्या यादीमध्ये प्रदीप बर्मन यांचे नाव होते. सोमवारी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तिघा जणांमध्ये बर्मन यांचा समावेश आहे. त्यामुळे आपने जाहीर केलेली यादी योग्य होती असे त्यांनी आवर्जून सांगितले. यानंतर केजरीवाल यांनी आणखी १५ जणांची नावेही जाहीर केली. धीरुभाई अंबानी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, कोकिलाबेन अंबानी, संदीप टंडन, नरेश गोयल, यशवर्धन बिर्ला यांनीही परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा दडवला आहे असा दावा केजरीवाल यांनी केला. केंद्र सरकार या प्रकरणात पक्षपातीपणे कारवाई करत असून सर्व ८०० खातेधारकांची यादी त्यांनी जाहीर करावीत असे त्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान एका मोठ्या उद्योगसमुहाच्या मुंबईतील रुग्णालयाचे उद्घाटन करतात. यामुळे आयकर विभागाच्या अधिका-यांना चुकीचा संदेश जातो असे टोलाही त्यांनी लगावला.