मागच्या बाकाबाबत शिवसेना पत्र देणार
By Admin | Updated: November 27, 2014 02:26 IST2014-11-27T02:26:14+5:302014-11-27T02:26:14+5:30
शिवसेना खासदारांना आसन देण्याच्या मुद्दय़ावर शिवसेना गंभीर असून, या प्रकरणी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देण्यात येईल असे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी सांगितले.

मागच्या बाकाबाबत शिवसेना पत्र देणार
नवी दिल्ली : शिवसेना खासदारांना आसन देण्याच्या मुद्दय़ावर शिवसेना गंभीर असून, या प्रकरणी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र देण्यात येईल असे केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी सांगितले. शिवसेनेच्या खासदारांना लोकसभा सभागृहात सन्मानजनक आसन दिले गेले नसून दुय्यम वागणूक मिळत असल्याची तीव्र नाराजी नायडू यांच्याकडे शिवसेनेचे गटनेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी मंगळवारी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे, त्यानंतर खा. शिवाजीराव आढळराव पाटील व खा. भावना गवळी यांनी दुपारच्या सत्रतील कामकाजात भाग घेतला नाही. आज या सदस्यांनी कामकाजात भाग घेतला, पण नाराजी कायम असल्याने शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष सुमित्र महाजन यांची भेट घऊन नायडू यांना पत्र देण्याचे ठरविले.
शिवसेनेच्या खासदारांना लोकसभेत मागच्या बाकावर बसविण्यात आल्याविषयी गिते यांनी लोकमतला सांगितले, की भाजपाचे मंत्री वाढल्याने त्यांनी त्यांच्या सोयीनुसार आसनांमध्ये बदल केले आहेत. मात्र ते करताना नायडू यांनी आसनांची शिफारस ज्येष्ठतेनुसार करणो आवश्यक होते. त्यामध्ये सुधारणा करावी असे आम्ही त्यांना सांगितले आहे, आता त्यांना तसे पत्र देणार आहोत. (विशेष प्रतिनिधी)