गुलबर्गप्रकरणी दोषींना फाशीच द्या
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
२००२ मधील गुलबर्ग हाउसिंग सोसायटीवर झालेला हल्ला अतिशय निर्दयी, क्रूर आणि अमानुष स्वरूपाचा होता.

गुलबर्गप्रकरणी दोषींना फाशीच द्या
अहमदाबाद : २००२ मधील गुलबर्ग हाउसिंग सोसायटीवर झालेला हल्ला अतिशय निर्दयी, क्रूर आणि अमानुष स्वरूपाचा होता. त्यामुळे या हत्याकांडात दोषी ठरविण्यात आलेल्या सर्व २४ आरोपींना फाशीची शिक्षा किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी या प्रकरणातील फिर्यादी पक्षातर्फे करण्यात आली आहे.
दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींच्या शिक्षेवर विशेष न्यायालय ९ जून रोजी सुनावणी करणार आहे. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे. न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा किंवा मरेपर्यंत तुरुंगात ठेवण्याची शिक्षा देण्याबाबत विचार केला पाहिजे, असे फिर्यादी पक्षाचे म्हणणे आहे. दोषींना कोणती शिक्षा द्यायची, यावर विशेष एसआयटी न्यायालयात तब्बल अडीच तासपर्यंत युक्तिवाद करण्यात आल्यानंतर न्यायाधीश पी. बी. देसाई यांनी सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली.
या विशेष एसआयटी न्यायालयाने गेल्या शुक्रवारी २४ आरोपींना दोषी ठरविले होते आणि ३६ जणांची निर्दोष सुटका केली होती. अहमदाबादच्या गुलबर्ग हाउसिंग सोसायटीवर झालेल्या हल्ल्यात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जण मारले गेले होते. (वृत्तसंस्था)