देश पुन्हा वेगवान विकास पथावर जावा
By Admin | Updated: February 7, 2015 02:36 IST2015-02-07T02:36:47+5:302015-02-07T02:36:47+5:30
देशाला पुन्हा वेगवान विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नव्या कल्पना सुचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अर्थतज्ज्ञांना केले आहे.

देश पुन्हा वेगवान विकास पथावर जावा
निति आयोगाची पहिली बैठक : जागतिक वातावरणाचा लाभ घ्यावा
नवी दिल्ली : तेलाच्या किमतीतील घट आणि अनुकूल जागतिक वातावरणाचा लाभ घेत देशाला पुन्हा वेगवान विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नव्या कल्पना सुचवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अर्थतज्ज्ञांना केले आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या निति आयोगाची शुक्रवारी मोदींच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक झाली.
महसूलवाढीला गती देण्यासह खर्चकपातीवर लक्ष देण्याची गरज असून येता अर्थसंकल्प विकासाभिमुख आणि गुंतवणुकीला चालना देणारा असावा यासाठी अर्थतज्ज्ञांनी आपली मते आणि सूचना द्याव्यात, असे ते म्हणाले. जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सध्याच्या जागतिक वातावरणाचा लाभ घेत भारताने वेगवान विकास घडवून आणायलाच हवा, असे मोदींनी स्पष्ट केले. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर भारताला विदेशी विनिमयाची मोठी बचत करण्यास मदत करणारा आहे. या अवस्थेत चिनी अर्थव्यवस्थेचा वेग कमी झाला असतानाच युरोपियन देशांमध्ये मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे भारताला गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी आली आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अर्थतज्ज्ञांसोबत चर्चा...
मोदींनी पहिल्यांदाच नवगठित निति आयोगाला भेट दिली. समाजवादाच्या काळापासूनचा योजना आयोग रद्द करून त्या जागी आलेला नवा आयोग ही शक्तिशाली संस्थात्मक यंत्रणा असून सरकारबाहेरील व्यक्तीही त्यात धोरणात्मक योगदान देऊ शकतील, असेही मोदींनी अर्थतज्ज्ञांसोबत चर्चा करताना स्पष्ट केले. गुंतवणूक आणि विकासवाढीला चालना देण्यासह अर्थसंकल्पाबाबत सूचना मागविण्यासाठी काही अर्थतज्ज्ञांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. निति आयोग हा ‘थिंक टँक’ म्हणून काम करणार असून आजची बैठक त्याचाच एक भाग होती.
असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.