विधानसभेतून-----
By Admin | Updated: December 12, 2014 00:09 IST2014-12-12T00:09:43+5:302014-12-12T00:09:43+5:30
पॅकेजचा पाऊस

विधानसभेतून-----
प केजचा पाऊसविरोधाचा दुष्काळ विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज, वैध सावकारांचे शेतकऱ्यांवर असलेले कर्ज, विजेचे तिमाही बिल माफ आदी घोषणांचा पाऊस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पाडला. मात्र, विरोधी बाकावरून कुणीही या पॅकेजविरोधात चकार शब्दही काढला नाही. घोषणेनंतर सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख जाणल्याची पावती दिली तर दुसरीकडे विरोधी बाकांवर मात्र सारे सुन्न होते. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य सभागृहात एकमेकांकडे पाहत होते. विरोधी पक्षनेते पद रिक्त असल्यामुळे कुणी विरोधाची सुरुवात करावी, कदाचित असा प्रश्न विरोधकांना पडला असावा. एकूणच सभागृहात विरोधकांकडून विरोधाचा दुष्काळ पहायला मिळाला. दूध उत्पादकांचा प्रश्न, वाळू धोरण, मंत्र्यांची अनुपस्थिती आदी मुद्यांवर दुपारपर्यंत आक्रमक असलेले विरोधक पॅकेजच्या घोषणेनंतर एवढे शांत कसे, सरकारच्या पॅकेजवर विरोधक समाधानी आहेत की काय, असे एक ना अनेक प्रश्न विरोधकांची स्तब्धता पाहून निर्माण झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी चर्चेला उत्तर देताना केलेली सुरुवात अतिशय भावुक होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचे सांगत ही वेळ का येते यावर सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज व्यक्त केली. एवढेच नव्हे तर निराशेच्या गर्तेत बुडालेल्या शेतकऱ्याला अख्खी विधानसभा पाठीशी असल्याचा विश्वासही द्यायला ते विसरले नाहीत. दूध उत्पादकांच्या प्रश्नावर दूध उत्पादक जिल्ह्यातील आमदारांनी एकत्र येत सरकारवर दबाव निर्माण केला. सभागृहाचे कामकाज रोखून धरले. शेवटी मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करीत प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्याचे आश्वासन द्यावे लागले. सत्ताधारी सदस्यांना आज पुन्हा छगन भुजबळ यांनी सभागृहात वावरण्याच्या संकेतांवरून कानपिचक्या दिल्या. सभागृहात कसे यावे, कसे बाहेर जावे, कसे बसावे याचे मार्गदर्शन त्यांनी सदस्यांना करीत अप्रत्यक्षपणे आपण सत्तेत असला तरी नवखे आहात हेच दाखवून दिले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षातर्फे दलित अत्याचारावर उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत विरोधी सदस्यांनी प्रभावीपणे मुद्दे मांडले तर सत्ताधाऱ्यांनी राज्यकारभाराला दीड महिनाच झाल्याचे सांगत ही परिस्थिती बदलू, असा विश्वास व्यक्त केला. - कमलेश वानखेडे