केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:00 AM2021-05-03T02:00:28+5:302021-05-03T02:00:57+5:30

भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा काँग्रेसलाही फटका

Left lead for the second time in Kerala | केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

केरळात दुसऱ्यांदा डावी आघाडी

Next

संजीव साबडे

केरळमध्ये मतदार दर पाच वर्षांनी सत्ताबदल घडवून आणतात. यात आतापर्यंत एकदाही खंड पडला नव्हता. पान यंदा चमत्कार घडला. सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला मतदारांनी सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. एवढेच नव्हे, तर विधानसभेच्या १४० पैकी ९० हून अधिक जागा माकप, भाकप आणि मित्र पक्षांच्या पारड्यात टाकल्या आहेत. म्हणजेच स्पष्ट बहुमत दिले आहे. यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहेत. यावेळी मतदार आपल्यालाच निवडून देणार, अशी काँग्रेस नेत्यांना खात्री होती. त्यातच २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधील जनतेने काँग्रेसला भरभरून मते दिली होती.

राहुल गांधी वायनाडमधून विजयी झाले होते. काँग्रेसचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले होते. त्या निकालांमुळे केरळमध्ये आपली लोकप्रियता वाढली आहे, डाव्यांविषयी जनतेत रोष आहे, असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले. ते दीड वर्षे गाफिल राहिले आणि हा गाफीलपणा आता भोवला. दीड वर्षे संघटना बांधणी केली असती, नेते, कार्यकर्ते सक्रिय राहिले असते, तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते. कोरोनाचा संसर्ग सुरुवातीला झाला केरळमध्येच. तेव्हापासून आजपर्यंत डाव्या आघाडीच्या सरकारने, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी खूप चांगले काम केले. संसर्ग रोखण्याकाठी त्यांनी केलेल्या कामाची सर्वांनी प्रशंसा केली. 

काँग्रेसला गटबाजी भोवली
n गेल्या सहा महिन्यांपासून केरळमध्ये सोने तस्करीचा मुद्दा गाजतो आहे. त्यात मुख्यमंत्री कार्यालयातील अनेक अधिकारी, राजकारणी व प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले गेले. त्यावरून डाव्या सरकारवर हल्ला चढवणे काँग्रेसला शक्य होते. पण तेही काँग्रेसने केले नाही. राहुल गांधी आपल्याला बहुमत मिळवून देणार या भ्रमात ते राहिले आणि मुख्यमंत्री कोणी व्हायचे यावरून नेत्यांची गटबाजी सुरू झाली.

डाव्यांना फायदा 
दुसरीकडे मुख्यमंत्री विजयन आणि त्यांचे सरकार अधिकाधिक लोकोपयोगी यिजना राबवत राहिले. कोरिया संसर्गाच्या व लॉकडाउनच्या काळात त्यांनी खूपच मदत केली. त्यामुळे लोकांना आपापसात न भांडणाऱ्या डाव्यांचे सरकार भावले. 

शिवाय डावे आणि काँग्रेस यांच्यात मतविभागणी झाल्यास त्याचा फायदा भाजपला मिळेल, हे विजयन आणून त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारांना नीट पटवून दिले. डाव्यांना दूर करण्यासाठी काँग्रेसला मते देण्याने भाजप वाढण्यापेक्षा आहे तेच बरे आहे, असे मतदारांनी ठरविले. भाजपला दूर ठेवण्याच्या प्रयत्नांचा फटकाही काँग्रेसला बसला, असे स्पष्टपणे दिसत आहे.

 

Web Title: Left lead for the second time in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.