कर्नाटकातील रामतीर्थ टेकडीवरील एका गुहेतून एका रशियन महिलेला आणि तिच्या दोन मुलींना रेस्क्यू करण्यात आलं. नीना कुटीना असं या महिलेचं नाव आहे, जी गेल्या आठ वर्षांपासून या गुहेत राहत होती. धक्कादायक बाब म्हणजे कोणालाही याची कल्पना नव्हती. आता रशियन महिला नीनाबद्दल समोर आलेली माहिती एखाद्या चित्रपटातील कथेसारखी आहे. तिच्या आयुष्याशी संबंधित रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
याच दरम्यान या महिलेचा पती समोर आला आहे. कर्नाटकातील गोकर्ण येथील एका गुहेत सहा आणि चार वर्षांच्या दोन मुलींसह राहणाऱ्या या महिलेच्या पतीने सांगितलं की ती त्याला न सांगता गोवा सोडून गेली होती. एनडीटीव्हीशी बोलताना इस्रायलमधील रहिवासी ड्रोर गोल्डस्टीनने आपली व्यथा मांडली. सुमारे आठ वर्षांपूर्वी तो गोव्यात नीना कुटीनाला भेटला आणि नंतर तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर ते सुमारे सात महिने भारतात एकत्र राहिले.
"आम्ही भारतात सात महिने एकत्र घालवले आणि त्यानंतर आम्ही युक्रेनमध्ये आणखी जास्त वेळ घालवला. गेल्या चार वर्षांपासून मुली प्रेमा (६ वर्षे) आणि अमा (५ वर्षे) यांना भेटण्यासाठी भारतात येत आहे. काही महिन्यांपूर्वी नीना मला न सांगता गोवा सोडून गेली आणि ती कुठे आहे हे मला माहित नव्हते. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती."
"तपासात असं दिसून आलं की ती मुलींसह गोकर्ण येथे राहत होती. मुली कशा आहेत हे जाणून घेण्यासाठी भेटायला गेलो होतो. पण तिने मला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू दिला नाही. माझ्यासाठी हे सर्व खूप कठीण आहे. मला माझ्या दोन्ही मुलींच्या संपर्कात राहायचं आहे आणि त्यांच्याजवळ राहायचं आहे. मी दरमहा नीनाला पैसे पाठवतो" असं पतीने सांगितलं आहे.
११ जुलै रोजी, पोलिसांनी नीना आणि तिच्या दोन मुलींना गोकर्णातील रामतीर्थ टेकडीच्या माथ्यावर असलेल्या गुहेतून रेस्क्यू करण्यात आलं. चौकशी केली असता, ४० वर्षीय नीनाने दावा केला की, ती आध्यात्मिक एकांताच्या शोधात गोव्याहून गोकर्ण येथे आली होती. शहरी जीवनाच्या धावपळीपासून दूर मेडिटेशन आणि प्रार्थना करण्यासाठी या गुहेत राहण्याचा निर्णय घेतल्याचं नीनाने म्हटलं आहे.