नेत्यांच्या घरी जाऊन हेरगिरी होत नाही - अरुण जेटली
By Admin | Updated: March 16, 2015 12:36 IST2015-03-16T11:48:18+5:302015-03-16T12:36:32+5:30
राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे.
नेत्यांच्या घरी जाऊन हेरगिरी होत नाही - अरुण जेटली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - राहुल गांधी यांची हेरगिरी केलेली नसून सुरक्षा व्यवस्थेचा नियमित आढावा घेण्यासाठीच दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेले होते असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले आहे. हेरगिरी करायचीच असती तर दिल्ली पोलिस त्यांच्या घरी गेली नसती, त्यामुळे विरोधकांनी सुरक्षा व्यवस्थेचे राजकारण करु नये असेही त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या घरी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांची एक पथक गेले होते. राहुल गांधी कसे दिसतात, उंची, डोळ्यांचा, ते कोणते शुज घालतात याविषयीची माहिती पोलिसांनी घेतली होती. या प्रकरणावरुन काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसने सोमवारी हा मुद्दा संसदेत उपस्थित करुन सत्ताधा-यांवर हेरगिरीचे आरोप केले. चौकशीच्या माध्यमातून सरकार राहुल गांधींची हेरगिरी करत असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने यावर संसदेत उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. अखेरीस केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत उत्तर दिले. १९८७ पासून दिल्ली पोलिसांचे विशेष पथक अति महत्त्वाच्या व्यक्तींची सखोल माहिती जमा करत असून सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती महत्त्वाची असते असे अरुण जेटलींनी सांगितले. देशाच्या माजी पंतप्रधांनांची आत्मघाती हल्ल्याद्वारे हत्या केली होती त्यावेळी माजी पंतप्रधानांची ओळख त्यांच्या बुटमुळे पटली होती असे जेटलींनी निदर्शनास आणून दिले. दिल्ली पोलिस ५२६ अति महत्त्वाच्या व्यक्तींची नियमित माहिती घेतात. युपीएसोबतच अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कालावधीतही ही माहिती घेतली जात होते. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, सुषमा स्वराज, लालकृष्ण आडवाणी आणि माझीही माहिती दिल्ली पोलिसांनी वेळोवेळी घेतली होती असे जेटलींनी स्पष्ट केले. विरोधक या चौकशीवरुन नाहक गदारोळ घालत आहे असेही त्यांनी नमूद केले.