नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून हिंदुत्ववादी शक्तींनी विविध क्षेत्रांत आपला ‘अॅजेंडा’ पुढे दामटण्याच्या हालचाली चालविल्या असताना काही वकील मंडळींनी भगवा झगा घालून चक्क सरन्यायाधीशांच्या न्यायालयात जाण्यापर्यंत मजल मारल्याची बाब समोर आली आहे.काळा कोट, गळ््याला पांढरा ‘बॅण्ड’ आणि काळा गाऊन असा गणवेश वकिलांसाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळी ठररेला आहे. परंतु काही वकील या नेहमीच्या गणवेशावर वरून आणखी भगवा झगा घालून काही महिन्यांपूर्वी सरन्यायाधीशांच्या न्यायालयात शिरले. हे अघटित घडले तेव्हा प्रसिद्धी माध्यमांमधून त्याची वाच्यताही झाली नव्हती. परंतु या प्रकाराची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने आता असा प्रकार अजिबात खपवून न घेण्याचे खरमरीत परिपत्रक काढल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.सर्व वकिलांनी योग्य गणवेश परिधान करूनच न्यायालयात यावे आणि याचे पालन न करणाऱ्यांना न्यायदालनात तर सोडाच पण न्यायालयाच्या आवारातही प्रवेश दिला जाणार नाही, अशी सक्त ताकीद या परिपत्रकात देण्यात आली आहे. मात्र जे वकील भगवे झगे घालून आले होते त्यांच्यावर त्यावेळी नेमकी काय कारवाई केली, याचा या परिपत्रकात उल्लेख नाही.(विशेष प्रतिनिधी)
वकिली झग्याचेही झाले भगवेकरण!
By admin | Updated: February 5, 2015 01:30 IST