दिल्लीत किरण बेदी यांच्या कार्यालयावर वकिलांचा हल्ला
By Admin | Updated: February 2, 2015 21:38 IST2015-02-02T18:29:02+5:302015-02-02T21:38:07+5:30
भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कार्यालयावर सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील वकिलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

दिल्लीत किरण बेदी यांच्या कार्यालयावर वकिलांचा हल्ला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने आता हिंसक वळण घेतले आहे. सोमवारी संध्याकाळी आंदोलनकर्त्या वकिलांनी भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या दिल्लीतील कार्यालयावर हल्ला केल्याची घटना घडल्याने तणाव निर्माण झाला आहे. हल्लेखोर वकिलांनी किरण बेदी यांच्या कार्यालयाची तसेच कार्यालयाबाहेरील गाड्यांची तोडफोड केली असून कार्यालयातील उपस्थितांना मारहाण झाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने या हल्ल्याच्या वेळी किरण बेदी कार्यालयात उपस्थित नसल्याने पुढील अनर्थ टळला.
किरण बेदी या १९८८ च्या दरम्यान दिल्लीत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना दिल्लीतील कोर्टाबाहेर आंदोलन करणा-या वकिलांवर लाठीमार झाला होता. तेव्हापासून दिल्लीतील वकिल आणि किरण बेदी यांच्यात वाद सुरु आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीतील हजारो वकिलांनी विशाल मोर्चा काढला होता. मोर्चा किरण बेदी यांच्या कृष्णनगर येथील कार्यालयाजवळ येताच आंदोलनकर्ते वकिल आक्रमक झाले. त्यांनी किरण बेदींच्या कार्यालयात घुसून कार्यालयाची मोडतोड केली तसेच कार्यालयातील उपस्थित कार्यकर्त्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती असा आरोप कार्यालयात उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने केला आहे. तर आम आदमी पक्षानेही या हल्ल्याचा निषेध दर्शवला असून लोकशाहीत हिंसेचे स्थान नाही, वकिलांनी शांतपणे त्यांचे आंदोलन केेले पाहिजे असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले