अन्य फास्ट फूडवरही कायद्याचा बडगा?

By Admin | Updated: June 7, 2015 23:12 IST2015-06-07T23:12:47+5:302015-06-07T23:12:47+5:30

नेस्लेच्या २ मिनिटात तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, येत्या काळात मॅगीपाठोपाठ अन्य ‘फास्ट फूड’ कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

Law on other fast food? | अन्य फास्ट फूडवरही कायद्याचा बडगा?

अन्य फास्ट फूडवरही कायद्याचा बडगा?

नवी दिल्ली : नेस्लेच्या २ मिनिटात तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, येत्या काळात मॅगीपाठोपाठ अन्य ‘फास्ट फूड’ कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने रविवारी याबाबतचे संकेत दिले. दरम्यान, मॅगीच्या विक्रीवर गोव्यानेही बंदी लादली असून, अशी बंदी लादणारे हे देशातील ११ वे राज्य ठरले आहे.
मॅगीपाठोपाठ अन्य फास्ट फूडवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाण्याचीही शक्यता आहे. ‘आयुष’चे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. मॅगीमध्ये शिसे आढळले होते आणि ते आरोग्यासाठी घातक होते. त्याचमुळे या उत्पादनावर बंदी लादण्यात आली. कदाचित अशीच अनेक उत्पादनातही हानिकारक पदार्थ असू शकतात. केवळ एका उत्पादनावर बंदी लादली आणि हा विषय संपला असे नाही, असे नाईक म्हणाले. तूर्तास मॅगीशिवाय अन्य अशी उत्पादने आढळलेली नाहीत. असे काही आढळताच ते जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी रविवारी मॅगी विक्रीवर बंदी जाहीर केली. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत मॅगीच्या नमुन्यांमध्ये कुठलेही हानिकारक पदार्थ आढळून आलेली नाहीत. मात्र तरीही देशभर मॅगीवर बंदी लादण्यात आल्याने आम्हीही कुठलीही जोखीम न पत्करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पारसेकर पणजी येथे बोलताना म्हणाले. दरम्यान ‘दि कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स’ने आरोग्यमंत्री व ग्राहक व्यवहारमंत्र्यांना पत्र लिहून मॅगीच्या ब्रँड अ‍ॅम्बेसडरविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

नेस्लेने जाहिरातीवर उधळले ४४५ कोटी; गुणवत्तेवर १९ कोटी
> मॅगी नूडल्सच्या गुणवत्तेबाबत नेस्ले इंडिया सध्या मोठमोठे दावे करीत असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. गतवर्षी नेस्ले इंडियाने जाहिरात आणि विक्री प्रचारावर ४४५ कोटी रुपये उधळले. याउलट आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि चाचण्यांवर नेस्ले इंडियाला केवळ १९ कोटी रुपये खर्च करावेसे वाटले.
> गत पाच वर्षांतही नेस्ले इंडियाने जाहिरातींवर दरवर्षी सरासरी ३०० ते ४५० कोटी रुपयांचा खर्च केला. याउलट प्रयोगशाळा आणि गुणवत्ता चाचण्यांवर वार्षिक १२ ते २० कोटी रुपये खर्च केले.
> नेस्ले इंडिया ही स्वीत्झर्लंडची बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेची भारतीय शाखा आहे. कंपनीच्या वार्षिक विवरणानुसार, गत पाच वर्षांत कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरील खर्चात ७५ टक्के वाढ झाली आहे. २०१० मध्ये हा खर्च ४४३ कोटी होता. २०१४ मध्ये तो वाढून ७५५ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला. कंपनीच्या जाहिरात आणि विक्री प्रचार खर्चातही ४७ टक्के वाढ झाली. २०१४ मध्ये ४४५ कोटी रुपये असलेला हा खर्च २०१० मध्ये केवळ ३०२ कोटी होता.

Web Title: Law on other fast food?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.