काळा पैसाधारकांना अखेरची संधी
By Admin | Updated: March 1, 2015 23:46 IST2015-03-01T23:46:17+5:302015-03-01T23:46:17+5:30
विदेशात काळा पैसा साठवून ठेवणाऱ्यांना कारावासाची शिक्षा टाळण्यासाठी विदेशी बँक खात्यातील रक्कम किंवा संपत्ती जाहीर करण्याची ही अखेरची संधी

काळा पैसाधारकांना अखेरची संधी
नवी दिल्ली : विदेशात काळा पैसा साठवून ठेवणाऱ्यांना कारावासाची शिक्षा टाळण्यासाठी विदेशी बँक खात्यातील रक्कम किंवा संपत्ती जाहीर करण्याची ही अखेरची संधी असेल, असे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.
अशा लोकांना विदेशातील संपत्ती जाहीर करण्यात अपयश आल्यास सात वर्षांच्या सश्रम कारावासाची तसेच उत्पन्न दडवून ठेवत करबुडवेगिरी केल्यास दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. संसदेच्या चालू अधिवेशनात संबंधित विधेयके आणली जातील. काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांना माफी दिली जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. माफीची कोणतीही योजना नाही. विदेशात मालमत्ता किंवा खात्यांमध्ये असलेला पैसा जाहीर करावा, अशी अपेक्षा आहे. तुमच्याकडे असलेली संपत्ती तुम्हाला जाहीर करावीच लागेल. विदेशी खाते ज्या दिवशी उघडले ती तारीख आयकर विवरणात समाविष्ट करणे बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.
एसआयटीकडून स्वागत
काळ्या पैशाविरुद्ध स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अर्थसंकल्पात काळ्या पैशाला अटकाव घालण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे स्वागत केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)