पाक सीमेवर लेझर भिंती!
By Admin | Updated: January 18, 2016 03:57 IST2016-01-18T03:57:44+5:302016-01-18T03:57:44+5:30
पंजाबमधील भारत-पाक सीमेवरील नदीभागात ४० पट्ट्यांमध्ये कुंपण नसल्यामुळे अतिरेक्यांना घुसखोरी करणे शक्य होत असल्याचे पाहता गृह मंत्रालयाने लवकरच तेथे लेझर भिंती उभारण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे

पाक सीमेवर लेझर भिंती!
नवी दिल्ली : पंजाबमधील भारत-पाक सीमेवरील नदीभागात ४० पट्ट्यांमध्ये कुंपण नसल्यामुळे अतिरेक्यांना घुसखोरी करणे शक्य होत असल्याचे पाहता गृह मंत्रालयाने लवकरच तेथे लेझर भिंती उभारण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पठाणकोट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अतिरेक्यांना अटकाव घालण्याचा त्यामागे उद्देश असेल.
नदीपात्राला लागून असलेला कुंपण नसलेला भाग पंजाबात असून, सीमा सुरक्षा दलाने विकसित केलेल्या ‘लेझर वॉल’ तंत्रज्ञानाद्वारे घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असे गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. लेझरचा स्रोत आणि डिटेक्टर यांच्यामध्ये असलेल्या रेषेतून एखादी वस्तू जात असल्यास ती हुडकून काढणारी ही यंत्रणा प्रभावी ठरू शकते. घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याचे आढळून येताच नदीवर लेझर किरण सोडला जात असतानाच मोठा आवाज होऊन सतर्कतेचा इशारा दिला जाईल.
हल्ल्यानंतर शहाणपण... : जैश-ए-मोहम्मदच्या सहा अतिरेक्यांनी पठाणकोट हवाईतळावर प्रवेशासाठी बामीयाल भागातील ऊजी नदीतून घुसखोरी केली होती. १३० मीटर रुंद या नदीच्या पात्रात कॅमेरा लावण्यात आला असला तरी त्यात फूटेज रेकॉर्ड होत नसल्याचे आढळून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
९ जानेवारी रोजी पठाणकोट हवाईतळाला भेट दिली त्या वेळी लेझर भिंतींनी हा भाग बुजवून टाकण्यात आला होता.