भूमाफियांचा प्रताप, चक्क जिल्हाधिका-यांचे घर, रेल्वे प्लॅटफॉर्मही विकले
By Admin | Updated: July 16, 2015 20:47 IST2015-07-16T20:47:02+5:302015-07-16T20:47:23+5:30
उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे भूमाफियांनी उच्छाद घातला असून या भूमाफियांनी आता चक्क रेल्वेचे प्लॅटफॉर्म, जिल्हाधिका-यांचे घर, शाळा, कृषी कार्यालयाचीही विक्री केल्याचे उघड झाले आहे.

भूमाफियांचा प्रताप, चक्क जिल्हाधिका-यांचे घर, रेल्वे प्लॅटफॉर्मही विकले
ऑनलाइन लोकमत
मुजफ्फरनगर, दि. १६ - उत्तरप्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे भूमाफियांनी उच्छाद घातला असून या भूमाफियांनी आता चक्क रेल्वेचे प्लॅटफॉर्म, जिल्हाधिका-यांचे घर, शाळा, कृषी कार्यालयाचीही विक्री केल्याचे उघड झाले आहे. या सरकारी मालमत्तेची किंमत कोट्यावधींच्या घरात पोहोचल्याचा अंदाज असून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली आहे.
बंटी और बबली या चित्रपटातील कथानकाप्रमाणेच मुजफ्फरनगरमधील भूमाफियांनी अक्षऱश: उच्छाद घातला आहे. या भूमाफियांनी जिल्हाधिका-यांचे घरच विकून दिले. ज्या मंडळींनी हे घर घेतले ती मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली व हा सर्व प्रकार उघडकीस आला. जिल्हाधिका-यांचे घर विकत घेतल्याचे सर्व पुरावेही त्यांनी सरकारी यंत्रणेसमोर सादर केले आहेत. भूमाफियांनी २००३ मध्ये काही सरकारी मालमत्तेची विक्री केली असून यात जिल्हाधिका-यांच्या घरासोबतच रेल्वे प्लॅटफॉर्म, रस्ता, शाळा, सरकारी कार्यालयांचीही विक्री केल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशमधील महसूल खात्याच्या सचिवांनी स्थानिक तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणात आत्तापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे समजते.