‘चांद्रयान-२’चे लॅँडिंग अवघ्या काही दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:46 AM2019-09-03T05:46:21+5:302019-09-03T05:46:54+5:30

चंद्रावर उतरण्याआधीचा महत्त्वाचा टप्पा यशस्वी : लॅँडरच्या विलगीकरणाची कामगिरी फते

Landing of 'Chandrayaan-2' within a few days | ‘चांद्रयान-२’चे लॅँडिंग अवघ्या काही दिवसांवर

‘चांद्रयान-२’चे लॅँडिंग अवघ्या काही दिवसांवर

googlenewsNext

बंगळुरु : महिनाभरापूर्वी श्रीहरीकोटा येथून अंतराळात भरारी घेऊन चंद्राच्या कक्षेत पोहोचलेल्या ‘चांद्रयान-२’मधील प्रत्यक्ष चंद्रावर उतरवायची ‘विक्रम’ (लॅण्डर) आणि ‘प्रज्ञान’ (रोव्हर) ही दोन उपकरणे मुख्य यानापासून अचूकपणे विलग करण्याची कामगिरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी सोमवारी फत्ते केली. यामुळे ‘विक्रम’ व ‘प्रज्ञान’च्या अवघड चांद्रवारीतील पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला.

अंतराळात सोडलेल्या मूळ यानाचा ‘आॅर्बिटर’, ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ असलेला भाग गेले काही दिवस चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत होता. या तिन्हींची बांधणी एकत्रित होती. यापैकी ‘आॅर्बिटर’ पुढील चार वर्षे चंद्राभोवती घिरट्या घालणार आहे व ‘लॅण्डर’ आणि ‘रोव्हर’ चंद्रावर उतरवायचे आहेत. त्यासाठी पुढील स्वतंत्र प्रवासासाठी या दोन उपकरणांना ‘आॅर्बिटर’पासून विलग करणे हा एक महत्त्वाचा टप्पा होता. 

इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार या विलगीकरणासाठीची सर्व स्वचलित यंत्रणा बसविण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे कामे पार पाडण्याची ‘कमांड’ भूनियंत्रण केंद्राकडून दिली गेल्यावर ही स्वचलित यंत्रणा कार्यान्वित झाली व सोमवारी दु. १.१५ वाजता ‘आॅर्बिटर’पासून ‘लॅण्डर’ व ‘रोव्हर’ अचूकपणे विलग झाले. विलगीकरणानंतर या दोन्ही उपकरणांमधील सर्व यंत्रणा पूर्णपणे ठाकठीक आहेत, असेही ‘इस्रो’ने नमूद केले.

ही दोन्ही उपकरणे येत्या ५ सप्टेंबर रोजी पहाटे १.५५ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशात अलगदपणे उतरविली जायची आहेत. चंद्रावर उतरणे सुरु करण्याआधी त्यांना चंद्राच्या ३६ बाय १०० किमीच्या सुयोग्य कक्षेत आणावे लागेल. त्यासाठी मंगळवारी व बुधवारी कक्षा सुधारण्याची दोन कामे केली जातील.

चंद्राच्या पृष्ठभागाकडे झेपावणाऱ्या ‘लॅण्डर’चा वेग हळूहळू नियंत्रित करणे व आतील अत्यंत नाजूक यंत्रणांचे कोणतेही नुकसान न होता अखेरीस ते चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशातील खोल विवरांच्या भागात चारही पायांवर तोल सांभाळून नीट उभे राहील, अशा पद्धतीने अलगद उतरविणे ही पुढील कामे थरारक आव्हानाची आहेत. पुढील तीन दिवस असेच यश मिळत गेले तर चंद्रावर यान अलगद उतरविण्याचे कौशल्य मिळविणारा अमेरिका, रशिया व चीन यांच्यानंतर भारत जगातील चौथा देश ठरेल.

Web Title: Landing of 'Chandrayaan-2' within a few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.