भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: March 22, 2015 12:52 IST2015-03-22T12:37:01+5:302015-03-22T12:52:51+5:30
भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच असून या विधेयकाविरोधात काँग्रेस शेतक-यांमध्ये गैरसमज पसरवत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच - नरेंद्र मोदी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - भूसंपादन विधेयक शेतक-यांच्या हिताचेच असून या विधेयकाविरोधात काँग्रेस शेतक-यांमध्ये गैरसमज पसरवत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीने ग्रासलेल्या शेतक-यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही मोदींनी दिले आहे.
रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतक-यांशी संवाद साधला. या संपूर्ण कार्यक्रमात मोदींचा भर भूसंपादन विधेयकावर होता. भूसंपादन कायदा १२० वर्ष जून असून जी लोकं आता शेतक-यांचे हितचिंतक म्हणून बोलत आहेत त्या लोकांनीही याच कायद्यानुसार राज्य केले असे सांगत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला. भूसंपादनासोबतच भारतात १३ असे कायदे आहेत ज्यात भूमी अधिग्रहण करता येते, यात रेल्वे, खाण व राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे असे मोदींनी निदर्शनास आणून दिले. भूसंपादन कायद्यातील त्रुटी दूर करुन शेतक-यांचे हित साधण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मोदींंनी स्पष्ट केले.
नवीन विधेयकात भूसंपादनात शेतक-यांना चार पट नुकसान भरपाई मिळेल, याशिवाय तिथे औद्योगिक कॉरिडोर झाल्यास गावातील तरुणांना रोजगारही मिळू शकेल, प्रकल्पासाठी जागा देणा-यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळेल असे आश्वासन मोदींनी दिले आहे.