राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांची पक्षामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. तेजप्रताप यांनी त्यांच्या पर्सनल आयुष्याबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तेजप्रताप यांची हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांचे बंधू तेजस्वी यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांना हे आवडत नाही आणि ते सहनही करू शकत नाही.
तेजस्वी यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मला हे सर्व आवडत नाही आणि सहनही होत नाही. मी माझं काम करत आहे. माझ्या मोठ्या भावाबद्दल सांगायचं तर ते प्रौढ आहेत आणि त्यांना पर्सनल निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते त्यांच्या पर्सनल आयुष्यात जे काही करत आहे, ते कोणालाही विचारून करत नाही. आम्हालाही तुमच्याद्वारे (माध्यमांद्वारे) याबद्दल माहिती मिळाली.”
तेजप्रताप यांच्याबाबत लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या ट्विटवर तेजस्वी म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं जाहीरपणे मांडलं आहे आणि ते त्यावर काहीही बोलणार नाहीत. तेजस्वी यादव यांनी संपूर्ण प्रकरणाला पर्सनल बाब म्हटलं आहे. कुटुंब आणि पक्षाची स्वतःची शिस्त असते, परंतु प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पर्सनल आयुष्यात निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं म्हटलं आहे.
आपल्या वर्तणुकीमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या तेजप्रताप यादव यांनी काल सोशल मीडियावर एका तरुणीसोबतचे फोटो शेअर करून तिच्यासोबतच्या नात्याबाबत माहिती दिली होती. मात्र नंतर ही पोस्ट डिलिट करताना आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला होता. त्यावरून चर्चांना उधाण आले होते. तसेच यावरून तेजप्रताप यादव आणि आरजेडीवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर आज लालू प्रसाद यादव यांनी ही कारवाई केली आहे.