आरसीएच्या अध्यक्षपदी ललित मोदी
By Admin | Updated: May 6, 2014 13:32 IST2014-05-06T11:01:37+5:302014-05-06T13:32:31+5:30
बीसीसीआयने बंदी घातल्यानंतरही ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट असोसिएनशच्या(आरसीए) अध्यक्षपदी निवड झाल्याने बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.

आरसीएच्या अध्यक्षपदी ललित मोदी
ऑनलाइन टीम
जयपूर, दि. ६- बीसीसीआयने बंदी घातल्यानंतरही ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट असोसिएनशच्या(आरसीए) अध्यक्षपदी निवड झाल्याने बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. मात्र त्यानंतर बीसीसीआयनेही धक्कादायक निर्णय घेत मोदींना अध्यक्ष बनवणा-या राजस्थान क्रिकेट असोसिएशनलाच मंडळातून निलंबित केले आहे.
राजस्थान क्रिकेट असोसिएनशच्या अध्यक्षपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली होती. मंगळवारी जयपूरमध्ये या निवडणुकीचा निकाल जाहीर करत एन. एम. कासलिवाल यांनी ललित मोदींची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. या निवडणुकीत ललित मोदींना २४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राम लाल शर्मा यांना ५ मते मिळाली.
ललित मोदी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजयी होतील असे निवडणुकीच्या निकालापूर्वीच सांगण्यात येत होते. त्यामुळेच मोदी निवडून आल्यास कडक करावाई करण्यात येईल असा इशारा बीसीसीआयने राजस्थान क्रिकेट असोसिएशनला दिला होता.
अखेर मंगळवारी मोदींची निवड झाली व त्यानंतर बीसीसीआयने आरसीएलाच निलंबित केले. मात्र असे असले तरी बीसीसीआयला हा निर्णय फारसा उपयोगी ठरणार नाही. कारण आरसीएच्या अध्यक्षपदासाठी झालेली ही निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व निर्देशानुसार झाली होती. त्यामुळे बीसीसीआयच्या कारवाईचा काही उपयोग होणार नसल्याचे सुत्रांनी बीसीसीआयच्या निलंबनाच्या कारवाई पूर्वीच म्हटले होते. त्यामुळे आता बीसीसीआय व आरसीएमध्ये आता कायदेशीर लढाई रंगण्याची चिन्हे दिसत आहे.