पाकिस्तानी न्यायालयाचे लख्वीला समन्स
By Admin | Updated: January 6, 2015 23:57 IST2015-01-06T23:57:43+5:302015-01-06T23:57:43+5:30
मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी झकी उर रेहमान लख्वी याच्याविरोधात पाक न्यायालयाने समन्स काढले

पाकिस्तानी न्यायालयाचे लख्वीला समन्स
इस्लामाबाद : मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी झकी उर रेहमान लख्वी याच्याविरोधात पाक न्यायालयाने समन्स काढले असून, २६-११ प्रकरणी लख्वी याला मिळालेल्या जामिनाच्या पुढच्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्या. शौकत सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यीय खंडपीठाने पाक सरकारची दहशतवादविरोधी न्यायालयाने लख्वीला मंजूर केलेल्या जामिनाविरोधातील याचिका दाखल करून घेतली आहे. कोर्टाने लख्वी याच्याविरोधात समन्स काढले असून, त्याला नोटीसही बजावली आहे, असे मुख्य सरकारी वकील चौधरी अजहर यांनी सांगितले. न्यायालयाकडून पुढची तारीख दिली जाईल असे अजहर यांनी सांगितले.
दहशतवादविरोधी न्यायालयाने २६-११ प्रकरणातील कबुली जबाबाकडे लक्ष न देताच लख्वीला जामीन मंजूर केला, असे सरकारतर्फे आज न्यायालयाला सांगण्यात आले.
१८ डिसेंबर रोजी एटीसी (दहशतवादविरोधी न्यायालय)ने मुंबई हल्ल्याचे नियोजन, अर्थकारण, कार्यकारण यात सहभागी असणाऱ्या झकी उर रेहमान लख्वी याला सशर्त जामीन मंजूर केला होता.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकारने त्याला कायदा व सुरक्षा कायद्याखाली अटक केली; पण इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नुरुल हक कुरेशी यांनी कायदा व सुरक्षा कायद्याखाली लख्वीची अटक रद्द केली. यामुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी त्याची सुटका होण्याआधीच त्याच्यावर अफगाण नागरिकाच्या अपहरणाचा खटला दाखल करण्यात आला व त्याला पुन्हा अटक झाली.
याप्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. लख्वी गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तानच्या अदियाला तुरुंगात शिक्षा भोगत आहे. १५ जानेवारी रोजी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यापुढे हजर केले जाईल. (वृत्तसंस्था)
लख्वी, अब्दुल वाजीद, मजहर इकबाल, हमद अमीन सादिक, शहीद जमील, जमील अहमद व युनूस अंजुम यांच्याविरोधात मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानात चालू आहे. सरकारने लख्वीच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले आहे. लख्वीला डिसेंबर २००८ मध्ये मुंबई हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, २५ नोव्हेंबरपासून त्याच्यावर हा खटला चालू आहे.