Kulbhushan Jadhav: पाकिस्ताननं वकिलावर केलेला खर्च वाचून धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 11:37 IST
कुलभूषण जाधव यांना हेर सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानकडून कोट्यवधी रुपये खर्च
Kulbhushan Jadhav: पाकिस्ताननं वकिलावर केलेला खर्च वाचून धक्का बसेल!
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला आहे. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं या प्रकरणात कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.पाकिस्तानच्या वतीनं अधिवक्ता खावर कुरेशींनी कुलभूषण प्रकरणात युक्तिवाद केला. ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलेल्या कुरेशींनी पाकिस्तानची बाजू मांडली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्तिवाद करणारे ते सर्वात कमी वयाचे अधिवक्ते ठरले. कुलभूषण भारताचे हेर असल्याचे सिद्ध करण्यासाठी कुरेशी यांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. त्यासाठी पाकिस्ताननं २० कोटी रुपये मोजले. मात्र तरीही कुरेशी अपयशी ठरले. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान खर्च करत असलेल्या रकमेची माहिती गेल्या वर्षी उपलब्ध झाली होती. पाकिस्तान सरकारच्या अर्थसंकल्पात याचा उल्लेख होता. ब्रिटनमध्ये राहणारे अधिवक्ते खावर कुरेशींना या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी २० कोटी दिले जात असल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं होतं. मात्र इतकी रक्कम खर्च करुनही आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा मुखभंग झाला. या प्रकरणात भारताच्या वतीनं हरिश साळवेंनी युक्तिवाद केला. न्यायालयात हरिश साळवेंनी केलेला युक्तिवाद अतिशय महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच १६ न्यायाधीशांच्या खंडपीठानं १५-१ असा निकाल दिला आणि भारताला मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर हरिश साळवे पुन्हा एकदा चर्चेत आले. देशातील प्रख्यात वकिलांपैकी एक असलेल्या साळवेंची एक दिवसाची फीज २५-३० लाख रुपये असल्याचं बोललं जातं. मात्र त्यांनी कुलभूषण प्रकरणात भारताची बाजू मांडण्यासाठी केवळ १ रुपया घेतला. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना त्यांना ट्विटरवर एकानं याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी स्वराज यांनी साळवे घेत असलेल्या फीजची माहिती दिली होती. हरिश साळवेंनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये युक्तिवाद केलेला आहे. २०१५ मध्ये हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला थेट आर्थर रोड तुरुंगात नेण्याची तयारी केली जात होती. मात्र साळवे यांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली आणि नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर सलमानला जामीन मिळाला. यासोबत साळवेंनी व्होडाफोन कर प्रकरण, रिलायन्स गॅस वाद अशा महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये युक्तिवाद केला आहे.