Kolkata Rape Murder case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाली. संबंधित प्रकरणातील आरोपी संजय रॉयला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रविवारी आरोपीच्या आईने दिली. मुलाला फाशीची शिक्षा झाली, तरी माझा त्याला आक्षेप नसेल. कारण त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मी एकट्याने रडेन, माझे नशीब समजून सर्व गोष्टींचा स्वीकार करेन. एक महिला व तीन मुलींची आई असल्याने मी त्या पीडितेच्या मातेचे दु:ख समजू शकते, असे नमूद करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. सियालदह येथील एका न्यायालयाने शनिवारी रॉय याला दोषी ठरवले होते. सोमवारी न्यायालय आरोपीच्या शिक्षेवर सुनावणी करणार आहे.
संजयची आई मालती रॉयने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, एक महिला आणि तीन मुलींची आई असल्याने, त्या महिला डॉक्टरच्या आईचे दुःख आणि वेदना मला जाणवते. न्यायालयाने माझ्या मुलाला फाशी देण्याचा निर्णय घेतला, तर माझा आक्षेप नसेल. संजयवरील आरोप खोटे असते, तर मी त्याला भेटण्याचा प्रयत्न केला असता. पण, कायद्याच्या दृष्टीने त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे मी त्याला न्यायलय परिसरात भेटायलाही गेले नाही.
घटनेच्या दिवशी काय झाले?आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार रुममध्ये 10 ऑगस्ट 2024 रोजी एका महिला डॉक्टरचा नग्नावस्थेत मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी संजय रॉयला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 64 (बलात्कार), 66 (मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शिक्षा) आणि 103 (1) (हत्या) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. कलम 103(1) मध्ये मृत्यू किंवा जन्मठेपेची तरतूद आहे.
मी दोषी नाही - संजय रॉयशनिवारी सियालदह न्यायालयाने संजय रॉयला दोषी घोषित केले तेव्हा संजयने न्यायाधीशांसमोर गयावया केली. मी दोषी नाही, मला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. मी हे कृत्य केलेच नाही, ज्यांनी हे कृत्य केले त्यांना सोडण्यात येत आहे, असा दावा त्याने केला. पण, पुरावे तपासून कोर्टाने संजयला दोषी ठरवले, आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे.
घटनेनंतर सुमारे 162 दिवसांनी निर्णय2024 मध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या सुमारे 162 दिवसांनंतर न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला आणि संजय रॉय यांना दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी सुमारे 57 दिवस चालली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिस करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने 13 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सीबीआयने 120 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुमारे दोन महिने या प्रकरणी कॅमेरा ट्रायल सुरू होती.