किरण बेदींच्या प्रवेशामुळे भाजपात दरार ?
By Admin | Updated: January 19, 2015 15:42 IST2015-01-19T15:42:26+5:302015-01-19T15:42:26+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण बेदींना प्रवेश देऊन दिल्ली प्रदेश भाजपाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असला तरी प्रत्यक्षात बेदींमुळे पक्षांतर्गत खदखद सुरु झाली आहे.

किरण बेदींच्या प्रवेशामुळे भाजपात दरार ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण बेदींना प्रवेश देऊन दिल्ली प्रदेश भाजपाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असला तरी प्रत्यक्षात बेदींमुळे पक्षांतर्गत खदखद सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले भाजपा नेते जगदीश मुखी यांनी किरण बेदींच्या प्रवेशाविषयी पक्ष नेतृत्वाने माझ्याशी चर्चा केली नव्हती असे सांगत पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत.
गेल्या आठवड्यात माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. बेदी यांच्या प्रवेशामुळे भाजपाला केजरीवालांना सामोरे जाण्यासाठी एक सक्षम चेहरा मिळाला आहे. बेदी या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी चर्चाही दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र प्रत्यक्षात बेदींमुळे दिल्ली भाजपातील ज्येष्ठ नेते नाराज आहेत. जगदीश मुखी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांची नाराजी व्यक्त केली. 'बेदीना प्रवेश देताना प्रदेश कार्यकारिणीशी फारशी चर्चा झाली नाही बहुधा केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा झाली असेल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. तर दिल्लीतील भाजपा खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांनीही बेदी यांना मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध केला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धनही किरण यांच्या प्रवेशामुळे नाराज असल्याचे समजते.