किरण बेदींना वैतागून भाजपा प्रचारप्रमुखांचा राजीनामा
By Admin | Updated: February 2, 2015 11:47 IST2015-02-02T11:23:07+5:302015-02-02T11:47:44+5:30
भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख आणि भाजपा नेते नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे.

किरण बेदींना वैतागून भाजपा प्रचारप्रमुखांचा राजीनामा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस उरलेले असतानाच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख आणि भाजपा नेते नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे. टंडन यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचे कळवले आहे. बेदींच्या कारभारावर नाराज असल्यानेच टंडन यांनी हे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. या पत्रात त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे नमूद केली आहे.
' गेल्या तीन दशकांपासून मी भाजपाचा सदस्य असून दहा वर्षांपासून दिल्लीतून मी पक्षाचे कामकाज सांभाळत आहे. भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदावार म्हणून घोषित करण्यात आलेल्या किरण बेदी यांच्यासोबत माझे काम करणे कठीण आहे. त्यांचे वागणे ठीक नाही. बेदींचे सहकारी प्रत्येक मुद्यावर माझा अपमान करतात. गेल्या दहा दिवसांपासून त्या (किरण बेदी) ज्याप्रमाणे नेता व कार्यकर्त्यांवर हुकूम सोडत आहेत, त्या वातावरणात काम करणे माझ्यासाठी कठीण आहे', असे त्यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे.. तसेच आपल्या आरोपांत तथ्य आहे की नाही याबद्दल पक्ष चौकशी करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.