किरण बेदींसह अनेक दिग्गज पराभूत
By Admin | Updated: February 10, 2015 14:15 IST2015-02-10T13:37:37+5:302015-02-10T14:15:05+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर कृष्णानगर मतदारसंघातून पराभूत होण्याची नामूष्की ओढावली आहे.
किरण बेदींसह अनेक दिग्गज पराभूत
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर कृष्णानगर मतदारसंघातून पराभूत होण्याची नामूष्की ओढावली आहे. किरण बेदी यांना आम आदमी पक्षाच्या एसके बग्गा यांच्याकडून दोन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
दिल्लीत आपच्या झाडूने अन्य पक्षांची सफाई केली असून आपच्या झंझावातासमोर अनेक दिग्गजांना पराभव झाला आहे. 'केजरीवाल यांच्यासोबत विधानसभेतच डिबेट करु' असे म्हणणा-या किरण बेदींचे विधानसभेत प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले. कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवणा-या किरण बेदी पराभूत झाल्या आहेत. भाजपाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते व उमेदवार जगदीश मुखी यांचाही जगतपूरी मतदारसंघात पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार अजय माकन (सदरबाजार मतदारसंघ), राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी (ग्रेटर कैलास), किरण वालिया (नवी दिल्ली) यांचाही पराभव झाला आहे. या दिग्गज नेत्यांचा आपच्या नवख्या उमेदवारांनी पराभव केला हेदेखील विशेषच. आपमधून भाजपात आलेले विनोदकुमार बिन्नी यांचाही पराभव झाल्याचे समजते.