देशातील इसिस हल्ल्यामागे 'खुरासान' ग्रुप?
By Admin | Updated: March 8, 2017 12:07 IST2017-03-08T12:07:07+5:302017-03-08T12:07:07+5:30
सीरियामधील अलकायदाच्या 'खुरासान ग्रुप'च्या नावावरुन कानपूर-लखनऊमध्येही काही तरुणांनी अशाच प्रकारचा एक ग्रुप बनवला आहे.ग्रुपमधील सर्वजण इसिसपासून प्रभावित झालेत.

देशातील इसिस हल्ल्यामागे 'खुरासान' ग्रुप?
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 8 - सीरियामधील अलकायदाच्या 'खुरासान ग्रुप'च्या नावावरुन कानपूर-लखनऊमध्येही काही तरुणांनी अशाच प्रकारचा एक ग्रुप बनवला आहे. ग्रुपमधील सर्वजण इसिसपासून प्रभावित झाले आहेत, असा दावा अतिरिक्त महासंचालक दलजीत सिंह चौधरी यांनी केला आहे. स्थानिक तरुणांनी सोशल मीडियाद्वारे हा ग्रुप बनवल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या मदतीने ही लोकं एकमेकांच्या संपर्कात राहून दहशतवादी कारवायांची तयारी करतात, असा दावाही पोलिसांनी केला आहे.
इसिस कार्यप्रणालीचे अनुसरण
दिशाभूल करण्यात आलेले व या ग्रुपशी जोडले गेलेले सर्व तरुण इसिसच्या कार्यप्रणालीचे अनुसरण करत होते. उत्तर प्रदेश एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, कानपूर, लखनऊ आणि इटावामधील संशयित ठिकाणांहून लॅपटॉप, मोबाइल आणि मोठ्या संख्येत इसिसशी संबंधित साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, तरुणांकडे बॉम्ब बनवण्याचे साहित्यही आढळले. सध्या लॅपटॉप व मोबाइल फोनची तपासणी सुरू आहे. याद्वारे ग्रुपमधील सर्वजण किती जणांच्या संपर्कात होते व कोणाकोणाशी संवाद साधत होते, याचा शोध घेतला जात आहे.
नेमके काय आहे खुरासान?
इसिसने 2020पर्यंत भारतासहीत जगभरातील अनेक देशांवर वर्चस्व मिळवण्याची योजना आखली आहे. यानुसार इसिस युरोप, चीन, भारत आणि उत्तर आफ्रिकेवर वर्चस्व गाजवायचे आहे. आपल्या योजनांना कार्यान्वित करण्यासाठी इसिस एक नकाशादेखील बनवला आहे. नकाशावर स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रान्स भागाला 'अंदासुल' असे नाव दिले आहे. आठव्या ते पंधराव्या शतकापर्यंत हा परिसर मुरोच्या ताब्यात होता, तर भारतासहीत आशिया खंडाच्या एका मोठा भागाला 'खुरासान' नाव देण्यात आले होते. या संघटनेसोबत जोडले जाण्यासाठी भारतातील मुस्लमानांमध्ये काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
दपम्यान, मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारात भोपाळहून उज्जैनला जाणाऱ्या रेल्वेमध्ये जबडीत स्टेशनजवळ आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. यात 10 जण जखमी झाले असून, त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर काही तासांनी पोलिसांनी इटावा येथून एकाला आणि कानपूरहून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. या संशयितांचे इसिसशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.