तिरुवनंतपूरम : केरळात स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या कलानुसार सत्तारुढ डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) ५१४ ग्रामपंचायत, ५ महापालिका आणि ११ जिल्हा परिषदेत आघाडीवर आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ) ४०० स्थानिक संस्थांत आघाडीवर आहे. भाजपने २०१५ च्या तुलनेत चांगली कामगिरी केल्याचे दिसते.राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार सत्तारुढ डावी लोकशाही आघाडी १४ जिल्हा परिषदेपैकी १० ठिकाणी आणि १५२ पंचायत समित्यांपैकी १०८ ठिकाणी आघाडीवर आहे. भाजप २६ पंचायत समित्यांत पुढे आहे.राज्यातील १२०० स्थानिक स्वराज्य संस्थेच्या २१,८९३ प्रभागासह सहा महापालिका, ९४१ ग्राम पंचायती, १४ जिल्हा परिषद आणि ८७ नगरपालिकेत ८,१० आणि १४ डिसेंबर रोजी अशा तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात ७३.१२ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ७६.७८ टक्के आणि तिसऱ्या टप्प्यात ७८.६४ टक्के मतदान झाले होते.राज्याचे अर्थमंत्री टी. एम. थॉमस इसाक यांनी सत्तारुढ डावी लोकशाही आघाडी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत आघाडीवर असल्याचा दावा ट्विटरवर केला आहे.
केरळात सत्तारूढ डावी लोकशाही आघाडी पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 02:57 IST