Kerala Accident: केरळमध्ये अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. केरळमध्ये रस्त्यावर अडकलेल्या एका मांजरीला वाचवण्यासाठी बाईक थांबवणाऱ्या एका तरुणाचा ट्रक आणि कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मांजरीच्या पिल्लाला वाचवण्याच्या नादात तरुणाला ट्रक आणि कारने जोरदार धडक दिली ज्यात त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मांजरीचा जीव वाचला मात्र तरुणाचा मृत्यू झाला आहे.
शिजी असे मृत तरुणाने नाव आहे. तो कल्लाटोडचा रहिवासी होता. मंगळवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. रस्त्यावरील मांजरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठीशिजोने त्याची बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मांजरीचे पिल्लू ट्रकखाली येऊ नये म्हणून त्याने धाव घेतली आणि मांजरीला बाजूला केले आणि रस्त्याच्या मधोमध आला. ट्रक चालकाला काही समजण्यापूर्वीच ट्रकने शिजोला धडक दिली. ट्रकच्या धडकेनंतर शिजो रस्त्यावर पडला आणि समोरून येणाऱ्या कारच्या टायरखाली आला. ही संपूर्ण घटना तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
शिजोला ताबडतोब त्रिशूरमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. या घटनेपासून ट्रक चालकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेत मांजरीचा जीव वाचला असून तिला वाचवायला आलेल्या शिजोला आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील लातूर शहराजवळील नांदगावजवळ अशीच एक घटना घडली होती. रस्ता ओलांडणाऱ्या मोटारसायकलला टाळण्याचा प्रयत्न करताना बस उलटली होती ज्यात २५ जण जखमी झाले होते. ही बस अहमदपूरहून लातूरला येत होती. बस नांदगावजवळ येताच, वेगाने येणाऱ्या मोटारसायकलला टाळण्यासाठी चालकाने बस दुभाजकावर आदळवली. या दरम्यान एक भीषण अपघात झाला आणि बस उलटली. या अपघातात २५ जण जखमी झाले.