Kerala : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील पय्यावूर ग्रामपंचायतीने सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते, ज्यासाठी सर्व जाती आणि धर्माच्या लोकांची नोंदणी सुरू केली. 'पय्यावूर मंगलम' असे या उपक्रमाचे नाव ठेवण्यात आले. नोंदणी सुरू झाली, एकएक करत पुरुष आणि महिला नोदणी करत होत्या. नोंदणीअंती अर्ज तपासले असता, पुरुषांसमोर महिलांची संख्या नगण्य असल्याची बाब समोर आली.
लग्नासाठी नोंदणीकृत पुरुषांची संख्या ३००० होती, तर महिला फक्त २००. पुरुषांकडून इतक्या मोठ्या संख्येने अर्ज आल्यानंतर, पंचायतीने पुरुषांची नोंदणी थांबवली आणि फक्त महिलांच्या नोंदणीसाठी अर्ज घेण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचा उद्देश आर्थिक कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे लग्नात अडचणी येत असलेल्या पुरुष आणि महिलांचे लग्न करणे हा होता.
पंचायत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या उपक्रमामुळे लग्नाची प्रक्रियाच सोपी होणार नाही तर गरीब कुटुंबाची सोयदेखील होईल. पय्यावूर पंचायतीच्या अध्यक्षा साजू झेवियर यांनी या उपक्रमाबद्दल सांगितले की, हा सामूहिक विवाह सोहळा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत पूर्ण तयारी करत आहे. सामूहिक विवाहाचा हा उपक्रम महत्त्वाचा आहे.
बदलत्या काळात जिथे तरुण-तरुणींच्या लग्नात आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबाव वाढत आहेत, अशा कार्यक्रमांमुळे त्यांना दिलासा आणि आधार मिळतो. याशिवाय, पंचायतीने असाही निर्णय घेतला आहे की, सर्व जाती आणि धर्माचे लोक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. या सामूहिक विवाहात सहभागी होण्यासाठी मुलींची संख्या कमी असल्याने, पंचायतीने तरुणांचे अर्ज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.