महाविद्यालयांमध्ये होणारं रॅगिंग ही शिक्षण क्षेत्रामधील गंभीर समस्या आहे. कॉलेजमध्ये रॅगिंगच्या नावाखाली होणारी मारहाण, शोषण आदींच्या बातम्या सातत्याने येत असतात. बऱ्याचदा सिनियर विद्यार्थी आपल्या ज्युनियर्सनां रॅगिंगच्या नावाखाली सतावत असतात. अनेक प्रकरणात रॅगिंगमुळे धक्का बसलेले विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवतात. आता रॅगिंगबाबतची धक्कादायक घटना केरळमधील कोट्टयम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली आहे. येथे काही पीडित विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कोट्टयम येथे असलेल्या सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये मागच्या तीन महिन्यांपासून रॅगिंगचे प्रकार सुरू होते. याबाबत पहिल्या वर्षात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह नोंदवला होता. कॉलेजमध्ये रॅगिंग होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी तिसऱ्या वर्षातील पाच विद्यार्थ्यांना अटक केली.
पीडित विद्यार्थ्यांनी रॅगिंगबाबत पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमधून गंभीर आरोप केले आहेत. त्यामध्ये कम्पास आणि इतर वस्तूंचा वापर करून इजा पोहोचवणे, मग जखमांवर मलम लावणे आधींचा समावेश आहे. त्याशिवाय चेहरा, डोकं आणि तोंडावर क्रीम लावण्यास भाग पाडणे आदींसाठीही जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप झाला आहे. एवढंच नाही तर सिनियर विद्यार्थी रविवारी दारू खरेदी करण्यासाठी ज्युनियर विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करतात. तसेच मारहाण करतात, असे आरोपही पीडित विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार या रॅगिंगची सुरुवात मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झाली होती. आम्हाला विवस्त्र उभं राहण्यास भाग पाडलं गेलं, तसेच वेटलिफ्टिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या डम्बेल्सचा वापर करून आमच्यासोबत क्रौर्य करण्यात आले, असा आरोपही या विद्यार्थ्यांनी केला.