केजरी लागले कामाला

By Admin | Updated: February 12, 2015 05:23 IST2015-02-12T05:22:37+5:302015-02-12T05:23:30+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील न भूतो विजयाने मतदारांच्या अपार अपेक्षांचे ओझे खांद्यावर असल्याची जाण ठेवत आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्याआधीच हिरिरीने कामाला लागले.

Kejriya started working | केजरी लागले कामाला

केजरी लागले कामाला

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील न भूतो विजयाने मतदारांच्या अपार अपेक्षांचे ओझे खांद्यावर असल्याची जाण ठेवत आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्याआधीच हिरिरीने कामाला लागले.
सर्व आश्वासन एकट्याने पूर्ण करणे शक्य नाही. त्यासाठी निवडणुकीतील कटुता बाजूला ठेवून केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळावावे लागेल, या भावनेने केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह अनधिकृत वस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया हेही होते. केजरीवाल यांनी या दोघांना शपथविधीसाठी निमंत्रण दिले. नायडू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गरिबांना नुकसानभरपाई देण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे़ त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे. अनधिकृत वस्त्यांबाबत अलीकडेच केंद्राने ठराव पारित केला आहे. या ठरावाची अंमलबजावणी करायची झाल्यास महापालिका, दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) आणि केंद्राच्या मदतीची गरज आहे, असे सिसोदिया यांनी पत्रकारांना सांगितले. आणखी शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि पार्किंगसाठी जास्तीची जागा हवी आहे. त्यामुळे डीडीएकडे उपलब्ध असलेली जागा देण्याची विनंतीही आम्ही नायडूंना केली. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी नायडूंनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे, असेही त्यांनी सांगितले. केजरीवाल यांनी सकाळी दिल्लीच्या मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली व ‘आप’च्या जाहीरनाम्याच्या पूर्ततेसाठी आतापासूनच कामाला लागा, असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी संभाव्य मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत सहकाऱ्यांशी चर्चा केली.

मोदींना निमंत्रण

>पंतप्रधान मोदी यांनी केजरीवालांना गुरुवारी सकाळी १०.३० वाजता भेटीची वेळ दिली आहे. १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शपथविधीचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट असेल.
विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींनी शुभेच्छा दिल्याबद्दल केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले. दिल्लीशी निगडीत मुद्द्यांवर चर्चेसाठी लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे केजरीवाल म्हणाले.

> रामलीला मैदान सज्ज
शनिवारी होणाऱ्या केजरीवाल सरकारच्या शपथविधीसाठी दिल्ली सरकार, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धस्तरावर तयारी चालवली आहे़ मैदान सपाटीकरण आधीच झालेले आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका रॅलीसाठी हे काम करण्यात आले आहे़ तूर्तास रामलीलावर मोबाइल टॉयलेट लावण्याचे काम सुरू आहे़

> अरविंद केजरीवाल यांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नम्र नकार दिला आहे़ आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी केजरीवालांच्या या निर्णयाची माहिती दिली़ केजरीवाल जनतेचे मुख्यमंत्री असतील़ त्यामुळे जनतेपासून दूर जाण्याची त्यांची इच्छा नाही़ झेड प्लस सुरक्षा घेताच, त्यांच्यात आणि जनतेत आपोआप अंतर वाढेल़ त्यामुळेच केजरीवालांनी झेड प्लस सुरक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे आशुतोष म्हणाले़ अर्थात मुख्यमंत्री या नात्याने त्यांची सुरक्षा ध्यानात घेतली जायला हवी़ त्यामुळे त्यांच्याकडे काही सुरक्षा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

> गर्दीची चिंता , 

केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे़ मात्र ही गर्दी हजारांत असेल की लाखांत, हे निश्चित नसल्याने सोहळ्याच्या तयारीस लागलेल्या अधिकाऱ्यांची चिंता वाढलेली आहे़ ऐनवेळी अभूतपूर्व
गर्दी जमली तर व्यवस्था कोलमडण्याची भीती अधिकाऱ्यांना सतावत आहे़ २९ डिसेंबर २०१३ च्या केजरीवालांच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याला १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती़

> अमेरिकेचे नो कॉमेंट : दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर होताच भाजपाच्या पराभवावर चहूकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. अमेरिकन अधिकाऱ्यांनी मात्र या निकालावर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले़ पण अमेरिकेतील प्रसारमाध्यमे मात्र आपली भूमिका रोखठोकपणे मांडत असून, न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीयमध्ये ‘आप’चा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे, असे स्पष्ट म्हटले. -वृत्त/७

Web Title: Kejriya started working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.