दिल्लीत आता शाजिया इल्मी विरुद्ध केजरीवाल सामना
By Admin | Updated: November 8, 2014 03:47 IST2014-11-08T03:47:39+5:302014-11-08T03:47:39+5:30
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे जानेवारी-फेब्रुवारीत होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपल्या ‘मिशन ५०’ वर आता शेवटचा हात फिरवीत आहेत

दिल्लीत आता शाजिया इल्मी विरुद्ध केजरीवाल सामना
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे जानेवारी-फेब्रुवारीत होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपल्या ‘मिशन ५०’ वर आता शेवटचा हात फिरवीत आहेत. नवी विधानसभा १७ फेब्रुवारीपर्यंत स्थापन होणार आहे आणि यावेळी कोणतीही चूक न करता ५० पेक्षा जागा मिळविण्याचे लक्ष्य भाजपाने निर्धारित केले आहे.
उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कोणत्याही खासदाराला तिकीट न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, दिवंगत साहिबसिंग वर्मा यांचे चिरंजीव परवेश वर्मा आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल या नेत्यांनी राज्याच्या राजकारणात परतण्याची आपली इच्छा याआधीच जाहीर केलेली होती. परंतु आपापल्या लोकसभा मतदारसंघावरच लक्ष केंद्रित करण्याचे आणि पक्षाचे तिकीट मिळालेल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे या नेत्यांना सांगण्यात आले आहे.
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून यावेळी विजेंद्र गुप्ता यांच्याऐवजी आपच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांना भाजपाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असे या सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने केजरीवाल यांच्या विरुद्ध विजेंद्र गुप्ता यांना मैदानात उतरविले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपच्या उमेदवार राहिलेल्या शाजिया इल्मी केवळ ३०० मतांनी पराभूत झाल्या होत्या. केजरीवाल यांना टक्कर देऊ शकेल, असा एकही उमेदवार सध्या तरी भाजपाजवळ नाही. किरण बेदी यांनी केजरीवालांविरुद्ध लढण्यास आधीच नकार दिलेला आहे.
आपण शाजिया इल्मी यांच्या बाजूने प्रचार करू, असे कुमार विश्वास यांनी भाजपा नेत्यांना कळविल्याचे वृत्त आहे. आपचे किमान अर्धा डझन आमदार तिकीट मिळण्यासाठी भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. भाजपाने दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या असल्या तरी मागील १५ वर्षांपासून पक्ष विधानसभा निवडणुकीत मात्र सतत पराभूत होत आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ६० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. ही आघाडी आणि सध्या देशात दिसत असलेली मोदी लाट यावर स्वार होऊन यावेळी आपले ‘मिशन ५०’ यशस्वी होणारच, असा विश्वास भाजपाला वाटत आहे.