शपथविधीसाठी केजरीवाल यांचे गुडघ्याला बाशिंग!
By Admin | Updated: February 9, 2015 06:19 IST2015-02-09T06:16:09+5:302015-02-09T06:19:44+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) बहुमताने विजयी होत असल्याचे अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये

शपथविधीसाठी केजरीवाल यांचे गुडघ्याला बाशिंग!
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) बहुमताने विजयी होत असल्याचे अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आल्याने पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळेच की काय त्यांनी १० फेब्रुवारीला होणाऱ्या या मतमोजणीची वाट न पाहाता, मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आपले नातेवाईक आणि मित्रपरिवाराला निमंत्रण देण्यास सुरु वात केली आहे.
केजरीवालांच्या एका नातेवाइकाने त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याचे मान्य केले आहे. रविवारी केजरीवाल यांचे नातेवाईक त्यांच्या भेटीसाठी आले होते. केजरीवाल यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शपथविधी घेण्याचे ठरविले आहे आणि आम्हाला
त्याचे निमंत्रण दिले आहे, असे या नातेवाइकाने सांगितले. तथापि ‘आप’च्या कोणत्याही नेत्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)