केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: January 21, 2015 13:21 IST2015-01-21T13:05:04+5:302015-01-21T13:21:14+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून अरविंद केजरीवाल तसेच किरण बेदींनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

केजरीवाल, किरण बेदींनी भरला उमेदवारी अर्ज
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून आप व भाजपामध्ये प्रमुख लढत पहायला मिळत आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल तसेच भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला, यावेळी भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून तर किरण बेदी कृष्णानगरमधून ही निवडणूक लढवणार आहेत. तसेच काँग्रेसकडून अजय माकन यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज भरला असून ते सदर बाजार येथून निवडणूक लढवत आहेत.
अवघ्या काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या किरण बेदी यांची सोमवारी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. चर्चेपेक्षा कृती करण्यात आपल्याला जास्त रस आहे, असे किरण बेदींनी म्हटले होते. तर आपला लढा हा कोणत्याही एका पक्षाविरोधात नसून भ्रष्टाचार व महागाईविरोधात आहे. ज्याप्रमाणे दिल्लीतील जनतेने गेल्या निवडणुकीत आमच्यावर विश्वास ठेवला, तसाच तो यावेळीही ठेवावा असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. किरण बेदी आणि केजरीवाल हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका काँग्रेस नेते अजय माकन यांनी केली आहे.
दरम्यान मतदारांना पक्षांकडून पैसे घेण्याचे आवाहन करत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून आज त्या नोटीशीला उत्तर देण्याचा अखेरचा दिवस आहे.