खीमा, पापड आता ऑक्सफर्ड शब्दकोशात
By Admin | Updated: January 19, 2015 18:25 IST2015-01-19T18:10:45+5:302015-01-19T18:25:14+5:30
खीमा, पापड या भारतीय खाद्यपदार्थांच्या नावाचा आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे.

खीमा, पापड आता ऑक्सफर्ड शब्दकोशात
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - भारतीय खाद्यपदार्थांची जगभरातील खवय्यांना भूरळ पडत असून ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसनेही याची दखल घेतली आहे. खीमा, पापड या शब्दांचा आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला असून विशेष म्हणजे यंदाच्या ऑक्सफर्ड शब्दकोशात भारतीय भाषांमधील सुमारे २४० शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या नवव्या आवृत्तीचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले असून य आवृत्तीमध्ये खीमा, पापड, कडीपत्ता या भारतीय खाद्यपदार्थ्यांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसच्या शब्दकोष आणि व्याकरण विभागाचे प्रमुख पॅट्रीक व्हाईट यांनी सांगितले. यापैकी ६० टक्क्यांहून अधिक शब्द हे हिंदीतून घेतल्याचे त्यांनी नमूद केले. 'आम्ही जगभरात वापरल्या जाणा-या नवनवीन शब्दांचा शोध घेतो. हे शब्द किती प्रमाणात वापरले जातात याचा आमची तज्ज्ञमंडळी अभ्यास करतात. यानंतरच नवीन शब्दांना शब्दकोशात स्थान दिले जाते असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सुमारे ९०० ते एक हजार शब्दांचा ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या नवव्या आवृत्तीमध्ये एकूण ९०० शब्दांचा समावेश आहे.