केदारनाथ पुनर्वसन कामाबाबत नाराजी
By Admin | Updated: June 17, 2014 00:14 IST2014-06-17T00:14:17+5:302014-06-17T00:14:17+5:30
घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. येथे आलेल्या पुरात मंदिर परिसर संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता

केदारनाथ पुनर्वसन कामाबाबत नाराजी
नवी दिल्ली : मागील वर्षी केदारनाथ येथे आलेल्या अस्मानी संकटात उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या पुनरुज्जीवनाकरिता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने केलेल्या कामाबाबत केदारनाथ मंदिर समिती असंतुष्ट असून वर्षभरात फक्त दगडांची स्वच्छता व तुटलेले दार लावण्याव्यतिरिक्त काहीही काम झाले नसल्याचे समितीने अधोरेखित केले आहे.
या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. येथे आलेल्या पुरात मंदिर परिसर संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. मात्र, मूळ मंदिराला धक्का लागला नव्हता. या मंदिराच्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी एएसआयवर सोपविण्यात आली होती.
बद्री केदार मंदिर समितीचे अध्यक्ष गणेश गोदियाल यांनी एएसआयच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटले, एका वर्षात मंदिराची स्थिती जशीच्या तशीच आहे. स्वच्छता करण्याखेरीज कुठलेच काम येथे झालेले नाही.
या मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी एएसआयने ३५ लाखांचा खर्च केल्याचा दावा केला असून तो पैसा कुठे खर्च झाला, अशी गोदियाल यांनी सर्वेक्षणला पत्र पाठवून विचारणा केली आहे.
या पत्राला उत्तर देताना एएसआयने १८ ते २० कामांची यादी पाठविली असून त्यातील बरीचशी कामे मंदिर समितीने केल्याचे गोदियाल यांचे म्हणणे पडले. ते पुढे म्हणाले, एएसआयच्या कामाबाबत आम्ही नाखुश आहोत. त्यांनी आतापर्यंत फक्त मंदिराचा दरवाजाच तेवढा लावला आहे व त्याचा दर्जाही चांगला नाही.एएसआयचे डेहराडूनचे अधीक्षक अतुल भार्गव यांनी या आरोपांना फेटाळून लावताना, पहिल्या टप्प्यात प्रतिकूल हवामानामुळे काम करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे म्हटले. मात्र, जूननंतरच्या दुसऱ्या टप्प्यात काम सुरू झाले असल्याचा दावा त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)