घुमानच्या रेल्वेतही रंगणार कविसंमेलन अन् परिसंवाद
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:25+5:302015-03-14T23:45:25+5:30
- रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल : साहित्यिक-रसिकांचे संमेलन रेल्वे रुळापासूनच

घुमानच्या रेल्वेतही रंगणार कविसंमेलन अन् परिसंवाद
- ेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल : साहित्यिक-रसिकांचे संमेलन रेल्वे रुळापासूनच नागपूर : पंजाब येथील घुमान येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान ८८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनासाठी विविध ठिकाणाहून रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या रेल्वेने येणाऱ्या साहित्यिक आणि रसिकांमुळे विशेष रेल्वेही फुल्ल झाल्या असून संमेलनापूर्वी रेल्वेच्या डब्यातच साहित्यिक-रसिकांचे छोटेखानी अनौपचारिक संमेलन होण्याची चिन्हे आहेत, असे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रेल्वेगाड्याच्या बोग्यांना दिवंगत कवी आणि लेखकांची नावे देण्यात आली असून संबंधित कवी आणि लेखकाचे साहित्य बोगीत ठेवण्यात येईल, असे डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या. यंदा घुमान येथील साहित्य संमेलनाला रसिकांना जाता यावे म्हणून नाशिक आणि मुंबई येथून विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहे. नाशिक येथून १ एप्रिल रोजी निघणारी रेल्वे अकोला, नागपूर मार्गे भोपाळ, अमृततांडा येथे ३ तारखेला पोहोचेल. तर मुंबईहून निघणारी रेल्वे पुणे, भुसावळ, मनमाडमार्गे बियास येथे पोहोचेल. या दोन दिवसांच्या प्रवासात बोगीत कविसंमेलन आणि परिसंवादही रंगणार आहेत. आता तर रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या असून विमानांचेही आरक्षण फुल्ल झाले आहे. घुमानच्या साहित्य संमेलनात सहा ते सात हजार साहित्यप्रेमी येण्याची शक्यता असून विदर्भातून १९० लोकांनी नोंदणी केली आहे. यासंदर्भातले रेल्वेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. पंजाब शासनानेही हे साहित्य संमेलन पंजाब राज्याचा कार्यक्रम जाहीर केला असून भोजन आणि इतर व्यवस्था पंजाब शासनातर्फे करण्यात येणार आहे. या निमित्ताने घुमानचा विकास करण्याचा संकल्पही पंजाब सरकारने व्यक्त केला आहे. संमेलनासाठी पंजाब सरकारने मोठा निधी खर्च केला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा निधीही संमेलनाला लवकरच मिळेल, अशी अपेक्षाही माधवीताईंनी यावेळी व्यक्त केली.