कठुआत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
By Admin | Updated: January 7, 2015 23:52 IST2015-01-07T23:52:47+5:302015-01-07T23:52:47+5:30
जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात घुसखोरांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हाणून पाडला.

कठुआत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
सतर्क सीमा सुरक्षा दल : पाकची या आठवड्यातील पाचवी आगळीक; महासंचालकांचा सीमा भागाचा दौरा
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात घुसखोरांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी हाणून पाडला. हे दहशतवादी सीमेपलीकडून होत असलेल्या गोळीबाराच्या आड व दाट धुक्याचा फायदा घेत भारतात शिरण्याच्या प्रयत्नांत होते.
बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कठुआ जिल्ह्यातील पल्लिया भागात असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील चिलयारी-खोडा भागात दहशतवाद्यांच्या एका पथकाची हालचाल बीएसएफच्या जवानांनी हेरली. त्यांनी तात्काळ गोळीबार सुरू करून त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
पाकने या आठवड्यात घुसखोरीचा केलेला हा पाचवा प्रयत्न होता. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येपासून पाक घुसखोरांनी चारवेळेस असे प्रयत्न केले होते. त्या सर्वांना भारतीय लष्कराने हाणून पाडले.
दलाचे महासंचालक डी.के. पाठक यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सांबा व कठुआ जिल्ह्यांंच्या सीमेलगतच्या भागाचा दौरा केला. (वृत्तसंस्था)
दोस्ती बस आता वाघा सीमेपर्यंतच
लाहोर : पाकिस्तानने नवी दिल्ली आणि लाहोरला जोडणारी पाक-भारत दोस्ती बससेवा वाघा सीमेपर्यंतच मर्यादीत केली आहे. त्यामुळे १९९९ मध्ये सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच ही बस आता लाहोरऐवजी वाघा सीमेवरूनच परत येत आहे.
वाढत्या दहशतवादी धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकने म्हटले आहे. या निर्णयामुळे दोन्ही दिशांकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाघा सीमेवर बस बदलाव्या लागणार असून ते आता एकाच बसद्वारे दोन्ही देशांदरम्यान प्रवास करू शकणार नाहीत.
दोन्ही देशांदरम्यानची ही बससेवा १६ मार्च १९९९ रोजी सुरू करण्यात आली होती. लोकांचा परस्परांशी संपर्क वाढविण्याच्या उद्देशाने भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ही बससेवा सुरू केली होती.
ही बस आता वाघा सीमेपर्यंतच चालवली जाईल, असे पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाने (पीटीडीसी) सांगितले. पीटीडीसीने या बसचे संपूर्ण संचालन वाघा सीमेवरील आपल्या उपकार्यालयात हलविले आहे.
नवी दिल्ली आणि अमृतसर येथे जाणाऱ्या प्रवाशांना आता लाहोरहून दुसऱ्या बसने वाघा सीमेवर जाऊन तेथून ही बस पकडावी लागेल. त्याचप्रमाणे भारतातून येणाऱ्यांनाही वाघा सीमेवर उतरून दुसऱ्या बसने लाहोरला यावे लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तालिबान दहशतवाद्यांनी पेशावरमध्ये शाळेवर हल्ला करून १०० हून अधिक मुलांना ठार मारल्यानंतर पाक सरकार आता सुरक्षाविषयक मुद्यांवर कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही. यापूर्वी पोलीस वाघा सीमेवरून लाहोरच्या गुलबर्ग आणि नानकानासाहिब बसस्थानकांपर्यंत सुरक्षा पुरवत होते. त्याचप्रमाणे पोलीस गुलबर्ग आणि नानकानासाहिब येथून दोस्ती बसेसना वाघा सीमेपर्यंत सुरक्षा पुरवत होते. दोस्ती बस वाघा सीमेपर्यंतच मर्यादित ठेवण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांना थोडा त्रास होईल; परंतु आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठीच ही पावले उचलली आहेत. पाकच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने तात्पुरते अडथळे असतील तर ते दूर करून वाजपेयी आणि शरीफ यांच्या दुरदृष्टीनुसार ही बस पुन्हा थेट धावेल, असे म्हटले आहे. या बसवरील वाघा सीमेपर्यंतच धावण्याची मर्यादा ३१ डिसेंबरपासून अमलात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
‘त्या’ नौकेवरील चौघे संशयित अतिरेकीच; राजनाथसिंह यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली : ३१ डिसेंबरच्या उत्तररात्री शक्तिशाली स्फोटके घेऊन भारतीय सागरी हद्दीत शिरलेली आणि स्फोटात नष्ट करण्यात आलेली नौका संशयित दहतशवाद्यांशीच संबंधित होती, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी दिली़
गत सोमवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही त्या नौकेवरील चारजण संशयित अतिरेकी असल्याचे म्हटले होते़ आता राजनाथसिंह यांनीही त्याचा पुनरुच्चार केला़ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे, त्या पाकिस्तानी नौकेवरील चारजण संशयित अतिरेकी होते, हे स्पष्ट आहे, असे राजनाथसिंह म्हणाले़ अर्थात याबाबतच परिस्थितीजन्य पुरावे कोणते, हे सांगणे त्यांनी टाळले़
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १३ दोषी अतिरेक्यांना शिक्षा पूर्ण होण्याआधी सोडण्याची मागणी केली आहे़ या मुद्याबाबत छेडले असता, मी यासंदर्भात बादल यांच्याशी चर्चा करेल, असे राजनाथसिंह म्हणाले़ बादल यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या १३ आरोपींच्या मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती़
यापैकी पाचजण पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंतसिंह यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात आहे़ तर एक सप्टेंबर १९९३ च्या दिल्लीतील बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)