काश्मीरमध्ये तरुणांनी फडकावले इसिसचे झेंडे, बु-हान वाणीचे पोस्टर
By Admin | Updated: May 1, 2017 16:54 IST2017-05-01T16:54:41+5:302017-05-01T16:54:41+5:30
काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काही फुटीरतावाद्यांच्या नादी लागून तरुणांनी इसिस आणि बु-हान वाणीचे पोस्टर झळकावले आहेत.

काश्मीरमध्ये तरुणांनी फडकावले इसिसचे झेंडे, बु-हान वाणीचे पोस्टर
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 1- काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काही फुटीरतावाद्यांच्या नादी लागून तरुणांनी इसिस आणि बु-हान वाणीचे पोस्टर झळकावले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी हे इसिसचे झेंडे झळकावले आहेत. विद्यार्थ्यांनी लावलेले पोस्टर हटवण्यासाठी गेलेल्या जवानांवरही विद्यार्थ्यांनी दगडफेक केली आहे.
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. शनिवारी विद्यार्थ्यांनी श्रीनगरमधील गोजगी बाग परिसरातील पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी जवानांविरोधातच आंदोलन केले होते. घटनास्थळी पोलीस आले असता त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विद्यार्थ्यांवर लाठीचार्जही केला असून, त्यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी पुलवामातील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी जवानांविरोधातच मोर्चा काढला.
या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत इसिसचे झेंडेही फडकावले. काहींनी दहशतवादी बु-हान वाणीचे पोस्टरही लावले. जवानांनी विद्यार्थ्यांना पोस्टर हटवण्यास सांगितले असता, विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या घोषणा देत जवानांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी अथक प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यातील तरुणांची माथी भडकावून अशांतता पसरवण्याचं काम फुटीरतावादी नेते आणि सीमेपलीकडून होत आहेत. त्यामुळे काश्मीर कायम धुमसतं आहे.