काश्मीर पोलिसांच्या ऑटोमॅटीक रायफल्स अतिरेक्यांच्या हातात ?
By Admin | Updated: July 13, 2016 08:57 IST2016-07-13T08:57:14+5:302016-07-13T08:57:14+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक आंदोलना दरम्यान जमावाने आतापर्यंत सुरक्षा पथकांच्या ७० ऑटोमॅटीक बंदुका पळवून नेल्याची सूत्रांची माहिती आहे.

काश्मीर पोलिसांच्या ऑटोमॅटीक रायफल्स अतिरेक्यांच्या हातात ?
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १३ - जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक आंदोलना दरम्यान जमावाने आतापर्यंत सुरक्षा पथकांच्या ७० ऑटोमॅटीक बंदुका पळवून नेल्याची सूत्रांची माहिती आहे. कुलगाम भागातील दामहाल हांजी पोरा येथील पोलिस स्थानकावर झालेल्या हल्ल्याच्यावेळी जमावाने मोठया प्रमाणावर जम्मू-काश्मीर पोलिसांची शस्त्रे पळवून नेली.
मंगळवारी दोन वेगवेगळया घटनांमध्ये सुरक्षा जवानांकडून शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न झाला. त्रालमध्ये जमावाने पोलिस चौकीत तैनात असलेल्या चार कॉन्स्टेबलवर हल्ला करुन त्यांच्या बंदुका पळवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कशाबशी स्वत:च्या रायफल्स वाचवल्या. पण जमाव मॅगझिन घेऊन पळाला.
संध्याकाळी उशिरा शस्त्रास्त्र मिळवण्याच्या उद्देशाने कारालपूरामध्ये पोलिस चौकीवर हल्ला झाला. शनिवारी ब्रिजबेहरा येथे पोलिस चौकीवर हल्ला करुन आंदोलकांनी शस्त्रास्त्रांची लुट केली. काश्मीर खो-यात दशकभरापूर्वी शस्त्रास्त्रांची लुट सामान्य गोष्ट होती.
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीच्या मृत्यूनंतर पुन्हा या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिसकावून घेतलेल्या या बंदुका पुन्हा स्थानिक दहशतवाद्यांच्या हातात पडल्यानंतर सुरक्षापथकांविरोधात त्याचा वापर होईल असे सुरक्षा तज्ञांचे मत आहे.